आणि त्याच्या जीवनाचा रंग झाला बेरंग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

शिकून-सवरून नोकरी न मिळाल्याने त्याने इमारती रंगविण्याचे काम सुरू केले. विविध रंगांनी तो इमारतीला खुलवत होता. आजही तो सकाळी दहाच्या सुमारास रंगकाम करण्यास गेला. हातात ब्रश आणि रंग घेतला. मात्र पायाखालचा पत्रा फुटल्याने तो कोसळला...

कोल्हापूर ः नरंदे (ता. हातकणंगले) येथे आज सकाळी बंगल्याचे रंगकाम करत असताना दुसऱ्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू झाला. सुरेश आकाराम वारे (वय 55, मिरजवाडी आष्टा, ता. वाळवा, सांगली) असे त्यांचे नाव आहे. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली.

पोलिसांनी दिलेली माहिती, नरंदे येथे एका घराच्या रंगकामाचा ठेका मिरजवाडी (आष्टा) येथील सुरेश वारे यांनी घेतला होता. चार दिवसांपासून हे काम ते करत होते. आज सकाळी वारे कामगार घेऊन कामावर गेले होते. दहाच्या सुमारास वारे हे दुसऱ्या मजल्यावरील सिमेंटच्या पत्र्यावर उभे राहून, भिंतीला रंगकाम करत होते. त्या वेळी त्यांच्या पायाखालचा पत्रा फुटल्याने ते पडले. त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत होऊन ते बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने सीपीआर मध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात दिला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, दोन मुली आणि आई असा परिवार आहे. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: And the color of his life became colorless