कोल्हापुरात शेतकरी विरोधी कृषी कायद्यांचा निषेध; शिक्षकांचा आंदोलनास पाठिंबा

संदीप खांडेकर
Saturday, 16 January 2021

कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांचा आंदोलनास पाठिंबा जाहीर

कोल्हापूर : शेतकरी विरोधी कृषी फायदे आणि कामगार विरोधी श्रम संहितांची टिचर्स विथ फार्मर्स कोल्हापूर जिल्हा समितीतर्फे आज होळी करण्यात आली. दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर शेतकरी विरोधी कृषी कायद्यांचा निषेध करण्यात आला.निवेदनात म्हटले आहे की, मोदी सरकारने केलेले काळे कृषी कायदे रद्द करण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांनी पन्नास दिवसांपासून दिल्लीच्या सर्व सीमांवर धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे. 

आंदोलनात १२० हून अधिक शेतकरी शहीद झाले. 
मोदी सरकारने गांभीर्याने निर्णय घेण्याऐवजी चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांच्या अंमलबजावणीस पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. परंतू, समितीत कृषी कायद्याचे समर्थन करणाऱ्या व्यक्तींची नेमणूक केली असल्याने आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांवरील  अन्याय व दडपशाही सहन केली जाणार नाही.

हेही वाचा- बबन शिंदे यांचा अंधश्रद्धेवर प्रहार; अख्खं कुटुंबच रंगते भजना

 कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला असून, शेतकरी कामगार विरोधी आर्थिक धोरणांचा निषेध करण्यात आला.शेतकरी हिताच्या विरोधी काळे कृषी कायदे रद्द करा, सर्व शेतीमालाला एमएसपीची हमी द्या, कामगारविरोधी श्रमसंहिता रद्द करा, शिक्षणाचे खासगीकरण बाजारीकरण करणारे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण रद्द करा, वीज क्षेत्राचे संपूर्ण खाजगीकरण करणारे विधेयक रद्द करा, अशा मागण्या करण्यात आल्या.

आंदोलनात प्रा. डॉ. सुभाष जाधव, प्रा. डी. एन. पाटील, राजेश वरक, ईश्वरा गायकवाड, सुधाकर सावंत, उमेश देसाई, सी. एम. गायकवाड, महेश सूर्यवंशी, दत्तात्रय चौगुले, राजेंद्र पाटील, महादेव साबळे, सुरेश जाधव, हेमलता पाटील, संजय पाटील, युवराज सरनाईक, सुभाष धादवड सहभागी झाले होते.

संपादन- अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anti agricultural laws protested agitation in kolhapur