कोल्हापुरात अतिक्रमणविरोधी कारवाईला धडाक्‍यात सुरवात; छपऱ्यांवर मारला  हातोडा 

डॅनियल काळे
Thursday, 11 February 2021

कोल्हापूर शहर अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्यासह प्रशासनाने केला आहे.

कोल्हापूर : शहरातील बहुचर्चित अतिक्रमणविरोधी कारवाईला आज धडाक्‍यात सुरवात झाली. कपिलतीर्थ मार्केटपासून सुरु झालेल्या या कारवाईने संपुर्ण ताराबाई रोड अतिक्रमणमुक्त केला,तासाभरातच 50 हून अधिक खोकी,केबिन्स महापालिकेने जप्त केली.तर दुकानांच्या बाहेर आलेल्या छपऱ्यांवरही हातोडा मारला.आमदार चंद्रकांत जाधव यांच्यासह फेरीवाले कृती समितीची विनंती धूडकाउन लावत आज या मोहिमेचा धडाका सुरु करण्यात आला.महापालिकेने खोकी,उचलायला सुरवात करताच अनेक अतिक्रमणधारकांनी स्वताहून आपली 
अतिक्रमणे,खोकी,केबिन्स काढून घ्यायला सुरवात केली. 

कोल्हापूर शहर अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्यासह प्रशासनाने केला आहे.विशेषता अंबाबाई मंदिर परिसर हा अतिक्रमणमुक्त असावा,अशी सार्वत्रिक भावना आहे. या भावनेचा आदर करत प्रशासन गेल्या आठवडाभरापासून येथे कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी पुर्वतयारीही प्रशासनाने केली होती.फेरीवाल्यांना एक मिटर बाय एक मिटर अंतराचे पट्टे मारुन केवळ महाव्दार रोड,ताराबाई रोडवरील फेरीवाल्यांनाच येथे बसविण्याचे नियोजन प्रशासनाचे आहे. 

सम आणि विषय तारीख धरुन रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे नियोजन केले होते.पण अनेक फेरीवाल्यांना आणि त्यांच्या संघटनांना हे नियोजन मान्य नव्हते.आमदार चंद्रकांत जाधव,फेरीवाले कृती समितीने याला आक्षेप घेत शनिवारपर्यंत मोहिम थांबवावी,अशी विनंती केली होती.पण प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे,अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी आजच बैठक घेउया,असा निरोप फेरीवाले कृती समितीला धाडला होता.पण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ,आमदार चंद्रकांत जाधव यांच्यासोबतच बैठक व्हावी,असा अट्टाहास फेरीवाले समितीचा होता. 

हेही वाचा- शिक्षणातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या ओळख होणार ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांच्या ‘शिक्षक प्रेरणेतून'

शनिवारपर्यंत महापालिका ही मोहिम थांबवले,असे वाटत असतानाच गुरुवारी सकाळी दहा वाजता कपिलतिर्थ मार्केटच्या प्रवेशव्दारासमोरुन ही मोहिम सुरु झाला. या मार्केटचे जवळपास बंदच असलेले प्रवेशव्दार मोकळे करण्यात आले. येथे आता मोठा रस्ता खुला झाला आहे.त्यानंतर ही मोहिम ताराबाई रोडवर सुरु करण्यात आली. ताराबाई रोडवरील उर्मिला टॉकीजसमोरील खोकी, केबिन्स हटवायला सुरवात केली. यावेळी कांही फेरीवाले आम्ही माल काढून घेतो,अशी विनंवणी करत होते.पण या फेरीवाल्यांना गेल्या आठ दिवसापासून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग ताकीद करत होता.पण तरीही त्यांनी ऐकले नसल्याने महापालिकेने थेट खोकी उचलायला सुरवात केली. 

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anti encroachment action in kolhapur kolhapur marathi news