कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी संजयसिंह चव्हाण यांची नियुक्‍ती

सदानंद पाटील 
Wednesday, 20 January 2021

अडीच वर्षापूर्वी मित्तल यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली

कोल्हापूर - जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संजयसिंह चव्हाण ( आयएएस) यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची लातूर महानगरपालिकेत आयुक्‍त म्हणून बदली झाली आहे. गेली वर्षभर मित्तल यांच्या बदलीची चर्चा होती. अखेर आज हे बदलीचे आदेश निघाले आहेत. नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण हे गुरुवारी आपल्या पदाचा कार्यभार घेणार आहेत. त्यांनी यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी तसेच गडहिंग्लजचे प्रांताधिकारी म्हणून काम केले आहे. 

अडीच वर्षापूर्वी मित्तल यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची ही पहिलीच कारकिर्द राहिली. जिल्ह्यात आलेला महापूर व त्यानंतर आलेले कोरोनाचे संकट या दोन्ही काळात श्री.मित्तल यांच्यावर महत्वाची जबाबदारी होती. त्यांच्याच कारकिर्दितील वॉटर एटीएम खरेदी चांगलीच गाजली. याप्रकरणी राज्य शासनाला हस्तक्षेप करुन चौकशी करावी लागली. मॅट घोटाळ्याचे प्रकरणही लालफितीत अडकून पडले आहे. 

कोवीड काळात मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली खरेदीही राज्यात चर्चेत आली. जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरती, बदल्या, शिक्षकांची प्रकरणे या प्रकरणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही अनेकवेळा ताशेरे ओढले. श्री.मित्तल यांच्या बदलीची चर्चा सतत सुरु होती. दोन महिन्यांपासून त्यांची कोल्हापुरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली होणार अशी चर्चा होती. मात्र विद्यमान जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याच बदलीस विरोध करण्यात आला. 
दरम्यान, या बदलीबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जिल्हाधिकारी म्हणून होणाऱ्या बदलीची चर्चा थांबली. 

हे पण वाचायेणाऱ्या काळामध्ये भाजप पक्ष दुर्बिणीमधून शोधण्याची वेळ येईल

 

नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण हे एमपीएसीमधून 1993 साली उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. ते मुळचे भोळी ( ता.खंडाळा, जि.सातारा) येथील आहेत. कायद्याचे पदवीधर असलेल्या श्री.चव्हाण यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज (1998÷-2001), इचलकरंजी (2003-05) येथे प्रांताधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच पुणे येथे रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, प्रांताधिकारी, शेती महामंडळ मुख्य प्रशासन अधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच सध्या ते पुणे विभागीय आयुक्‍त कार्यालयात सामान्य प्रशासनचे उपायुक्‍त म्हणून काम करत आहेत.
  

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appointment of Sanjay Singh Chavan as Chief Executive Officer of Kolhapur Zilla Parishad