विद्यार्थ्यांनी बनविले पाण्यातील गवत कापणारे यंत्र 

पंडित कोंडेकर
Friday, 6 November 2020

डीकेटीईच्या अंतिम वर्ष मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी "ऍक्वेटीक मुव्हर टू कट ऍक्वेटीक वीड' या संकल्पनेवर आधारित पाण्यात उगवणारे गवत कापणारे यंत्र बनविले आहे.

इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या अंतिम वर्ष मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी "ऍक्वेटीक मुव्हर टू कट ऍक्वेटीक वीड' या संकल्पनेवर आधारित पाण्यात उगवणारे गवत कापणारे यंत्र बनविले आहे. प्रा. व्ही. पी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तन्मयी मेलवंनकी, रेवती तोडकर, प्रियंका पाटील व बाळकृष्ण पोईपकर यांनी हे यंत्र विकसित केले आहे. 

मॉन्सून हंगामात अनेक लहान मोठे तलाव, नदी दुथडी भरून वाहत असतात. या कालावधीत अनेक समस्यांना देखील सामोरे जावे लागते. यापैकी पाण्यात वाढणारे गवत, शेवाळ व जलपर्णी ही समस्या गंभीर बनत आहे. यामुळे तलाव व नद्या मोठ्या प्रमाणावर दूषित होतात. वाढलेल्या गवतामुळे पाण्यातील ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी होऊन माशांचे उत्पादन देखील कमी होते. असे जलस्रोत डासांच्या प्रजननासाठी अतिशय अनुकूल असतात. 

या समस्येचे नियंत्रण भौतिक, यांत्रिक, जैविक व रासायनिक पद्धतीने करता येते. या चारही पद्धतींचा अभ्यास करून स्वस्त वापरास सोपी, जलद व जैवविविधतेला धोका निर्माण न करणारे यंत्र तयार करण्यात आले आहे. या यंत्रामध्ये कटरचा वापर गवत कापण्यासाठी केलेला आहे. कापलेले सर्व गवत कन्वेयर मार्फत जाळीयुक्त कलेक्‍टरमध्ये जमा केले जाते. ही सर्व यंत्रणा बोटीवर जोडता येते. 

संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, ट्रेझरर आर. व्ही. केतकर, मानद सचिव डॉ. सपना आवाडे व सर्व विश्‍वस्तांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. मशीन तयार करण्यासाठी संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, विभागप्रमुख डॉ. व्ही. आर. नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aquatic Grass Harvester Made By Students Kolhapur Marathi News