गेटवरील जवानांनी विचारले कशासाठी आलात ; भरतीसाठी आलो अस म्हणत युवकांना झाला मनस्ताप

सकाळ वृत्तसेवा | Saturday, 31 October 2020

सैन्यदल भरती; भरती नसतानाही परराज्यांतील युवक बेळगावात

बेळगाव : प्रादेशिक सेनेत रिक्‍त असलेल्या जागांसाठी बेळगावात भरती प्रक्रिया आयोजित केल्याची चुकीची माहिती एका वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्याने परराज्यांतून आलेल्या युवकांना मनस्ताप सहन करावा लागला. प्रादेशिक सेनेत ४२ वर्षांपर्यंत भरतीची संधी असल्याने अनेक युवक नशीब आजमावण्यासाठी आज बेळगावात दाखल झाले होते. मात्र, बेळगावात सध्या भरती नसल्याचे समजल्याने त्यांना हात हलवत माघारी परतावे लागले.

प्रादेशिक सेनेच्या महार रेजिमेंट, पॅरा रजिमेंटसह अन्य रेजिमेंटसाठी ३० ऑक्‍टोबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत भरती प्रक्रिया आयोजित केल्याची बातमी काही वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली होती. ही भरती कर्नाटकसह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, गोवा, गुजरात राज्यांसह पुद्दूचेरी, दमण आणि दीव, दादरा नगर हवेली आदी केंद्रशासित प्रदेशातील युवकांसाठी खुली असल्याचे त्यात म्हटले होते. ही बातमी वाचून गुजरात, दमण दीवसह परराज्यातील काही युवक कालच (ता. २९) बेळगावात दाखल झाले होते. सध्या भरतीसाठी कोरोना चाचणीही सक्तीची केली आहे. त्यामुळे, भरतीसाठी आलेल्या अनेक युवकांनी कोरोना चाचणीही करवून घेतली होती.

Advertising
Advertising

राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या मैदानावर शुक्रवारी सकाळी त्यांनी गर्दी केली. मात्र, लष्करी जवानांनी त्यांना मैदानात प्रवेश दिला नाही. कशासाठी आलात असे गेटवरील जवानांनी त्यांना विचारले असता त्यांनी भरतीसाठी आल्याचे सांगितले. मात्र, सध्या येथे कोणतीच भरती नसल्याची माहिती जवानांनी दिली. तरीही या युवकांचे समाधान झाले नाही. मराठा इन्फंट्रीच्या गेटसमोर हे युवक सकाळी थांबलेले दिसून आले. अखेर भरती नसल्याची शहानिशा झाल्यानंतर त्यांनी परतण्याचा निर्णय घेतला. एका चुकीच्या माहितीमुळे अनेक युवकांचा वेळ व पैसा वाया गेला.

संपादन - अर्चना बनगे