मोठी बातमी; भारतातील पहिला शस्त्रक्रिया प्रयोग कोल्हापुरात ; समुद्री कासवाला बसविले कृत्रिम पाय

शिवाजी यादव
Thursday, 29 October 2020

हे समुद्री कासव  अंदाजे पंधरा वर्षे वयाचे आहे.
 कासवाचे वजन बारा किलो आहे. 

कोल्हापूर - वेंगुर्ले समुद्रकिनार्‍यावर दोन पायांनी जखमी अवस्थेत सापडलेल्या समुद्री कासवाला कृत्रिम पाय बसवून या कासवाचं जगणं पुन्हा पूर्ववत करण्यात कोल्हापूरच्या वनवृत्तातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर व त्यांच्या पथकाला यश आले आहे. समुद्री कासवाला कृत्रिम पाय बसवण्याचा भारतातील पहिलाच शस्त्रक्रिया प्रयोग यशस्वी झाल्याची माहिती डॉ. वाळवेकर यांनी दैनिक सकाळ'शी बोलताना दिली.

गेल्या काही दिवसापूर्वी समुद्रात मासेमारी करताना मासेमारी जाळ्यात समुद्री कासव जखमी अवस्थेत सापडले. त्याची माहिती मिळताच तेथील काही व्यक्तींनी कोकण वाईल्डलाईफकडे कासवाला सुपूर्द केले. मात्र कासवाचा पुढील डावा पाय तुटला होता तर मागील उजवा पाय तुटून तो लोंबकळत असल्याचे दिसले. ही जखम गंभीर असल्याचे पाहून या कासवावर सूक्ष्म उपचार व्हावेत यासाठी कोल्हापूरच्या वन्यजीव संक्रमण व उपचार केंद्रात देण्यात आले. येथे डॉ. वाळवेकर यांनी कासवाचे दोन्ही पाय कृत्रिम पद्धतीने बसवण्याचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून परवानगी मिळवल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू केले. कासवाच्या अन्य जखमांवर उपचार करून कासवाची ताकद वाढवली. पुढे कासवाच्या पायाचा आकार-उकार पाहून क्ले द्वारे इमेज तयार करून घेतल्या. त्यासाठी चंद्रकांत हल्याळ यांची मदत झाली तर पुढे डेंटल लॅब मधून कृष्णा पवार यांच्याकडून त्या पायांचा डेंटल मटेरियलमध्ये स्टीलचा साच्या तयार करून घेतला तर मूर्तिकार प्रदीप कुंभार यांच्याकडून सिलिकॉन कोअर मध्ये 250 ग्रॅम वजनाचा सिलिकॉनचा पाय, स्लीपर तयार करून घेतला. तो शस्त्रक्रियेद्वारे कासवाला बसवला.

जखमी अवस्थेत जेव्हा कासव आणले त्यावेळी दोन्ही पाय गंभीर जखमी असल्याने कासव हालचाल करू शकत नव्हते. कासवाला पोहोता येणे शक्य नव्हते अशा स्थितीत समुद्रात सतत पोहणाऱ्या व जीव-जंतू खाऊन जगणार्‍या कासवाचा जीव कासावीस झाला होता. 

अशा स्थितीत सिलिकॉनमध्ये बनवलेले कृत्रिम पाय कासवाला बसवल्यानंतर त्याची हालचाल होण्याची गती पूर्वीप्रमाणे होऊ लागली आणि इथेच कासवाच्या पायांची शस्त्रक्रिया प्रयोग यशस्वी झाल्याची साक्ष लाभली. 

या कासवाचे पाय होडीच्या व्हल्या प्रमाणे असतात. अगदी तसाच हुबेहूब पाय बनवून शस्त्रक्रियेद्वारे कासवाला बसविण्याच्या प्रयोगात यश मिळाल्याचे डॉ. वाळवेकर यांनी सांगितले. 

त्याआधारे ते कासव तंदुरुस्त झाल्यानंतर त्या कासवाला समुद्री आदिवास सोडण्याबाबत पुढील निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे.

 हे समुद्री कासव  अंदाजे पंधरा वर्षे वयाचे आहे.
 कासवाचे वजन बारा किलो आहे. 
कासवाचा एकूण आकार दीड फुटांचा असून 
हे कासव सतत समुद्रात वावरते. ते नागरी भागात किंवा भूपृष्ठावरील जगात आढळत नाही.
 

कासवाला कृत्रिम पाय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया विदेशात झाली आहे. मात्र भारतात अशी शस्त्रक्रिया यापूर्वी झालेली नव्हती, असा संदर्भ ट्रटल सरव्हावल अलाइंस या राष्ट्रीय संस्थेकडून डॉ. वाळवेकर यांना मिळाला आहे. 

हे पण वाचाकंटेनरने मागून दिली धडक अन् दुचाकीने घेतला पेट

वन्यजीवांवर दुर्मिळ शस्त्रक्रिया करणारे काही विदेशी डॉक्टरांच्या शस्त्रक्रियांचा आधार घेऊन या कासवावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात यश मिळवले असेही डॉ. वाळवेकर यांनी सांगितले. 

हे पण वाचा आई-वडील शेतात गेल्याची संधी साधून बालिकेवर अत्याचार

मुख्य वन्यजीव संरक्षक व्ही. क्लेमेंट बेन, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे समाधान चव्हाण, सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल अमृत शिंदे, वन्यजीव अधिकारी रावसाहेब काळे, सहाय्यक वन संरक्षक सुनील निकम आदींच्या मार्गदर्शनाखाली हा शस्त्रक्रिया प्रयोग यशस्वी करण्यात आला. त्यासाठी अजित कुंभार, आकाश भोई, वंचिता कांबळे, सानिका सावंत, ऋषिकेश मेस्त्री, अवधूत कुलकर्णी, प्रदीप सुतार, यश धावले यांचा सहभाग आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Artificial leg fitted with sea turtles in kolhapur