शेतकऱ्याचा 'हा' ठेवा जपलाच पाहिजे 

B seed storage methods are now obsolete
B seed storage methods are now obsolete

कोल्हापूर : मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतातील जमीन तयार झाली की, बी-बियाणांची चाचपणी सुरु होते. बियाणे नेमकं कुठे ठेवले आहे? ते सुरक्षित आहे का? ते किडलेले तर नाही ना, हे पाहिले जाते. आपल्याकडे अमुक एक बियाणे नसेल तर दुसऱ्याकडून ते बियाणे घ्यायचे. त्याबदली आपल्याकडील काही बियाणे दुसऱ्यांना द्यायचे, हा ग्रामीण ट्रेड अजूनही सुरु आहे; मात्र बि-बियाणे साठवण्याची पद्धती आता काहीशी कालबाह्य झालेली आहे. 

बियाणे बाजारातून विकत घेतले जाते. पूर्वीपार पद्धतीने घरात, खोपीत बियाणे जपून ठेवण्याची कला हळूहळू लोप पावत चालली आहे, हे खरेच. 

कितीतरी वर्षे बियाणे साठविण्याच्या पद्धतीमुळे ते बीज संवर्धित होत असे. आता ही प्रक्रिया होत होत नाही. विविध कंपन्यांनी आपली बियाणे, वाण विकसित केले आहे. हे विकसित बियाणे अनेक शेतकरी आज आपल्या शेतात, परसदारात वाढविताना दिसतात. यामुळे मुळ बियाणे लोप पावून या बियाणांची डीएनए रचना पुढील पिढीत संक्रमित होत नाही. कितीतरी पारंपारिक बियाणे लोप पावून ती जागा नवीन बियाणांनी घेतली आहे. काही ठिकाणी मात्र मुळ बियाणे संवर्धित ठेवण्याकडे लक्ष दिले जाते. यासाठी काही पूर्वीची तंत्रे वापरली जातात. जसे की, टोपल्यामध्ये, बुट्टीमध्ये हे बियाणे ठेवले जाते. तत्पूर्वी, मुळ बियाणे राखेमध्ये मिसळून टोपलीत ठेवतात. यासाठी कोणतेही रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. कुठलीही पावडर वापरली जात नाही. जेणेकरुन बियाणांना कसर किंवा किड लागत नाही. बियाणे नष्ट होत नाही. पावसाळा सुरु झाला की, टोपलीतून बियाणे काढून ते पेरले जाते. ग्रामीण भागात टोपलीत ठेवलेल्या या बियाला "बिवाळा' म्हणतात. हा बिवाळा अजूनही काही ठिकाणी दिसतो. अगदी पूर्वीच्या काही भातांच्या प्रजाती, नाचणा, गहू, मिरची, भोपळा, कारले, सावा, वरणा या मुळ रुपात अजूनही मिळतात. साठवण्याची ही किमया शेतकऱ्यांनी परंपरागत पद्धतीने जतन करुन ठेवली आहे. 

बाजारात काही कंपन्यांची बियाणे मिळतात; पण ही बियाणे अनेकदा बोगस निघतात. यातील अनेक बियाणे तर पोचट निघतात. म्हणजे, ते पेरले तरी उगवत नाहीत. शिवाय ही बियाणे खूप महाग ही असतात. यासाठी शेतकरी आपल्या गावात ज्यांच्याकडे अशी मुळ बियाणे आहेत, ती घेतात. त्याबदली आपल्याकडील काही बियाणे देतात. फक्त टोपल्यामध्ये बियाणांची साठवण होत नाही; तर ही बियाणे वेळू, नारळाचा काथ्या, वाळवलेला भोपळा, कागदाचा लगदा, रांजन, माठ आदीमध्ये ठेवले जाते. यासाठी हे बियाणे पूर्णपणे खडखडीत वाळवले जाते. जिथे पाणी पडणार नाही. आर्द्रता शोषली जाणार नाही, अशा सुरक्षित ठिकाणी ही बियाणे ठेवतात. जेणेकरुन पुढील पिढीसाठी ही बियाणे उपयोगाला येतील, हे पाहिले जाते. आता नवीन पिढीला हा बिवाळा म्हणजे काय, हे माहिती नाही. बियाणांचे संवर्धन करणे तर दुरची गोष्ट. शेतीला उपयुक्त अशीच बियाणे नाहीत; तर मसाल्याच्या पदार्थांच्या बिया, काजू, आंब्याची बाठ, बागायतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या फळांच्या बियाही टिकवून ठेवल्या जातात. 


हा ठेवा जपला पाहिजे 

लॉकडाऊनमुळे बि-बियाणांचे संघ, कंपन्यांची दुकाने बंद आहेत. जून सुरु होण्यास एक महिना आहे. शेत जमीन तयार करण्यासाठी लगबग सुरु आहे. लॉकडाऊन जर 15 जूनपर्यंत वाढले तर नवीन बियाणांचे काय करायचे, हा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. अशावेळी हा "बिवाळा' अनेकांना उपयोगात येईल. गावातील एकमेकांना बियाणे देण्याचा हा ट्रेंड शेती, पिके टिकून ठेवेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com