कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापुरकरांचा गुढीपाडवा साध्या पध्दतीनेच...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 March 2020

पाडवा पूर्वसंध्या आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम रद्द... 

कोल्हापूर - यंदाच्या नववर्षाचे स्वागत कोल्हापूरकर कोरोनामुक्तीच्या संकल्पानेच करणार आहेत. बुधवारी (ता.25) गुढीपाडवा असून यानिमित्ताने होणाऱ्या पाडवा पूर्वसंध्या मैफलीसह इतर सर्व सार्वजनिक कार्यक्रम व स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे साध्या स्वरूपात पारंपरिक पध्दतीने यंदा हा सण साजरा होणार आहे. दरम्यान, सर्व सराफ बाजारासह सर्वच बाजारपेठा बंद राहणार आहेत. त्याशिवाय गेली तीन दिवस टूव्हीलर व फोरव्हीलर शोरूमही बंद असून उलाढाल पूर्णपणे ठप्प होणार आहे. पाडव्यासाठी लागणाऱ्या गुढीच्या काठ्यांसह साखरेच्या माळा खरेदीसाठी आज सकाळपासूनच झुंबड उडाली. शहरातील प्रमुख चौकात गुढीच्या काठ्या आणि साखरेच्या माळा विक्रीसाठी उपलब्ध होत्या. 

गुढीच्या काठीचे यंदाही होणार ट्रीगार्ड 

गुढीच्या काठ्यांपासून ट्रीगार्ड तयार करण्याची संकल्पना आता अधिक व्यापक होवू लागली आहे. सुरवातीला केवळ काही गावांपुरती आणि पेठांपुरती मर्यादित असणारी ही संकल्पना सर्वच ठिकाणी आता अनुकरणीय ठरते आहे. गुढीपाडव्यानंतर लोकांनी फोन केल्यास घरी येवून विविध संस्था व ग्रुप्स काठ्या घेवून जाणार आहेत. याबाबतचे आवाहन आता सोशल मीडियावरून सुरू झाले आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the backdrop of Corona in kolhapur Gudi Padwa celebration is simple