या गावातील पोरं लय हुशार ; गावात इतकेजण झाले इंजिनिअर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bahirewadi village with more than two hundred engineers in Ajra taluka on Kolhapur Goa road

शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांचे जन्मगाव.

 बहिरेवाडी बनली अभियंत्यांचीवाडी

 

या गावातील पोरं लय हुशार ; गावात इतकेजण झाले इंजिनिअर

कोल्हापूर : कोल्हापूर-गोवा मार्गावरील आजरा तालुक्‍यातील बहिरेवाडी. शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांचे जन्मगाव. शिक्षण क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून गावातील नवीन पिढी कार्यरत आहे. आज दोनशेहून जास्त अभियंते या गावात आहेत. ही बहिरेवाडी आता अभियंत्यांचीवाडी बनली आहे.

बहिरेवाडीची नैसर्गिक ठेवण उंचावर आहे. गावाजवळ नदी किंवा मोठा ओढा नाही. यामुळे गावात कायमच पाणीटंचाई. शेतीही कोरडवाहूच. यामुळे उदरनिर्वाहासाठी पुणे, मुंबईला जाण्याकडेच येथील नागरिकांचा कल होता. मात्र, नवीन पिढीने शिक्षणातून प्रगती करण्याचा प्रयत्न केला आहे. गावात आज 200 हून अधिक तरुण अभियंते बनले आहेत. यातील काही जण वेगवेगळ्या ठिकाणी उच्च पदावर काम करीत आहेत.

हेही वाचा- कोल्हापूर बाजर समितीच्या संचालकांनी उधळले गुण अन् नेत्यांनी पाळले मौन

गावात 1980 मध्ये भैरवनाथ हायस्कूलची स्थापना झाली. 1988 मध्ये गावातील पहिले इंजिनिअर वसंत सावंत झाले. यानंतर गावात इंजिनियर बनण्याची चढाओढ लागली. इंजिनियर बनलेल्या युवकांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळू लागल्या. नवीन पिढीचा कलही त्या क्षेत्राकडे वाढला. माध्यमिक शिक्षण घेत असतानाच पालक व विद्यार्थी याची माहिती घेऊ लागले. दहावीनंतर डिप्लोमा डिग्री मिळवू लागले. देशात अव्वल समजल्या जाणाऱ्या इस्त्रो, मर्चंट नेव्ही, मुंबई महापालिका, महावितरण यासह महिंद्र, टेल्को या आघाडीच्या शासकीय आणि खासगी कंपन्यांनी त्यांना सामावून घेतले आहे.

राकेश महिंद, वसंत सावंत, सतीश इंचनाळकर, सर्जेराव पाटील, शशिकांत पिटके, राम ढोणुक्षे, सुहास अत्याळकर, आवबा पाटील, मारुती मिसाळ, राम जासूद, राजू जोंधळे, प्रमोद इंचनाळकर, संदीप मारुती मोरे, चंद्रकांत माने यांचा प्रामुख्याने यात उल्लेख करावा लागेल. सुमारे पंधरा अभियंते परदेशात काम करतात.

हेही वाचा- कोल्हापूरातील पंचगंगा नदीची पाणीपातळी तीन फुटांनी वाढली  , पूरस्थिती कायम

नवीन पिढीसाठी हा संघ करतो काम

नोकरीनिमित्त अभियंते परगावी, परदेशात असले तरी गावाशी असलेली नाळ त्यांनी टिकवून ठेवली आहे. विशेषतः त्यांच्या जीवनाची जडणघडण करणाऱ्या शाळेत अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी भैरवनाथ माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. त्याद्वारे सहा लाखांचा निधी जमवून भैरवनाथ हायस्कूलमधील वीजपुरवठा, फरशी काम, संगणक अशा कामांसाठी दिला.

गावातील नवीन पिढीसाठी हा संघ काम करतो. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मार्गदर्शन करणे, शिक्षण पूर्ण झालेल्या युवकांना नोकरी मिळवून देणे हे कार्य केले जाते. यासाठी पुणे येथे एक गट तयार करण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांनी गावातील भैरीदेव मंदिर बांधकामासाठी मदत केली आहे. सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचा मुख्य दरवाजा त्यांच्या कल्पनेतून साकारला. गावातील शेतकऱ्यांनाही त्यांचे मार्गदर्शन मिळत आहे. गावाने यापूर्वी कांदा उत्पादनात नाव मिळविले. बटाटा उत्पादनासाठी आता प्रयोग सुरू आहेत.

हेही वाचा- कोल्हापुरात स्वॅब तपासणी यंत्रणा कोलमडली ; प्रमुखांचे मौन -

तीन तालुके, 13 गावांच्या सीमा
गावाला हुक्केरी, कागल, गडहिंग्लज या तीन तालुक्‍यांच्या व हडलगा, बड्याचीवाडी, वडरगे, बेकनाळ, कडगाव, मुमेवाडी, माद्याळ, हुडे, तमणाकवाडा, वडगाव, हणबरवाडी, बेरडवाडी, बाळेघोल या तेरा गावांच्या सीमा असलेले जिल्ह्यातील हे एकमेव गाव आहे.

दोन बोलीभाषा
गाव महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर वसले आहे. यामुळे गावात कन्नड व मराठी या दोन्ही बोलीभाषा गावातील नागरिकांना अवगत आहेत.

गावातील युवक इंजिनियर क्षेत्राकडे वळल्याने नागरिकांचा आर्थिक स्थर उंचावला आहे. नोकरीनिमित्त काम करणाऱ्या युवकांनी एकत्र येऊन गावात आतापर्यंत दहा लाख खर्च केले आहेत. यापुढेही विकासकामांत योगदान देण्यासाठी नियोजन सुरू आहे.
- सी. एस. माने, अध्यक्ष, भैरवनाथ माजी विद्यार्थी संघ

संपादन - अर्चना बनगे
 

loading image
go to top