यंदाच्या दीपोत्सवात फटाक्‍यांवर बंदी येण्याची शक्‍यता

Ban on firecrackers during this year Deepotsav Possibility meeting of Kolhapur Municipal Corporation
Ban on firecrackers during this year Deepotsav Possibility meeting of Kolhapur Municipal Corporation

कोल्हापूर : यंदाच्या दीपोत्सवात शहरात फटाक्‍यांवर बंदी येण्याची शक्‍यता असून, याबाबतचा निर्णय आज (बुधवारी) कोल्हापूर महापालिकेच्या सभेमध्ये घेतला जाण्याची शक्‍यता आहे. कोरोनाचा संसर्ग आणि वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात मुंबई, पुणे, सांगलीबरोबरच अनेक महापालिकांनी फटाके विक्रीवर बंदी आणली असून, या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर महापालिकेकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. उद्याच्या सभेमध्ये नियमावली ठरविली जाणार आहे. 


शहर आणि जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी येत्या काळात दुसरी लाट येण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची प्रभावी अंमलबजावणी केली जाऊ लागली आहे. खरेदीसाठी बाहेर जाताना मास्क बंधनकारक असून, मास्क न वापरणाऱ्यांवर महापालिकेने दंडात्मक कारवाईला प्रारंभ केला आहे. गर्दी करणाऱ्या दुकानांवर कारवाईचा इशाराही महापालिकेने दिला आहे. मास्क व सामाजिक अंतराचे पालन ही ज्या त्या दुकानदाराची जबाबदारी असून, त्याचे पालन न झाल्यास काही काळ ही दुकाने बंद करण्याच्या सूचना भरारी पथकांना देण्यात आल्या आहेत.


दिवाळीच्या काळात फटाक्‍यांमुळे ध्वनी व वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. त्यातच बोचरी थंडीही वाढू लागली आहे. त्यामुळे विविध आरोग्यविषयक तक्रारी वाढू लागल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर दिवाळीत ध्वनी व वायू प्रदूषण वाढले तर हृदयविकार, फुफ्फुसाच्या विविध विकारांबरोबरच कानांचे विकारही बळावण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे केवळ पर्यावरणप्रेमी संस्थाच नव्हे, तर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांबरोबरच विविध संस्था, संघटनांनीही यंदा फटाके न वाजवण्याबाबतचे आवाहन केले आहे. 


या साऱ्या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासनाकडूनही फटाक्‍यांवर बंदीबाबतच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. 
दरम्यान, दीपोत्सव कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करूनच साजरा करावा. धार्मिक स्थळे अद्यापही खुली नाहीत. त्यामुळे मर्यादित स्वरूपात घरच्या घरी उत्सव साजरा करावा. फटाक्‍यांपेक्षा दिव्यांची आरास अधिक करून उत्सव साजरा करण्यावर भर द्यावा. दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित न करता डिजिटल प्लॅटफॉर्मवरून त्याचा आनंद रसिकांना द्यावा. सांस्कृतिक कार्यक्रमांपेक्षा आरोग्यविषयक कार्यक्रमांवर अधिक भर द्यावा. कोरोना, मलेरिया, डेंगी, चिकुनगुनिया आदी आजारांबाबत प्रबोधन उपक्रम राबवावेत. मात्र, तेथेही अधिक गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहनही महापालिकेने केले आहे. 

‘सकाळ’च्या भूमिकेला बळ
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा प्रदूषणमुक्त दिवाळीची भूमिका ‘सकाळ’ने घेतली. या भूमिकेचे समाजाच्या सर्वच स्तरांमधून जोरदार स्वागत होत आहे. विविध संस्था, संघटनांनीही त्याला पाठिंबा देऊ केला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिका प्रशासन फटाक्‍यावर बंदी आणण्याचा विचार करत आहे. एक प्रकारे ‘सकाळ’ने घेतलेल्या भूमिकेला पाठबळ देऊन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करत कोरोनाला रोखण्यासाठी दमदार पाऊलच टाकले आहे.


संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com