कोल्हापुरातली भिशी काळे धंदेवाल्यांच्या हाती.... 

सुधाकर काशीद
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

भिशीचे हे उदाहरण केवळ प्रातिनिधिक आहे. महिन्याला चार ते पाच लाख रुपये प्रत्येकी भरणारे अनेक भिशी मेंबर आहेत. अशा भिशीत मोठी रक्कम जमते. बसल्या बैठकीला प्रत्येक महिन्याला बहुतेकांना महिना वीस ते पंचवीस हजार रुपयांची कमाई होते.

कोल्हापूर - ही भिशी दहा जणांची आहे. प्रत्येकाने महिन्याला वीस हजार रुपये भरायचे. एकूण रक्कम होते दोन लाख रुपये. मग ही रोख रक्कम एका टेबलवर ठेवायची. सभोवती दहा जणांनी बसायचे. आणि लिलावाला सुरुवात करायची. हे दोन लाख रुपये ज्याला हवे त्याने लिलाव बोलायचा. म्हणजेच हे दोन लाख रुपये जादा वीस ते तीस हजार रुपये देऊन घ्यायची तयारी दाखवायची. समजा एखाद्याने तीस हजार रुपये लिलावात बोली केली तर त्याला दोन लाख भिशीच्या रकमेतून तीस हजार रुपये कापून घेऊन एक लाख ७० हजार रुपये द्यायचे. व त्याने पुढे दोन लाख रुपये भरायचे. आणि भिशीतून कापून घेतलेले तीस हजार रुपये दहा जणांनी प्रत्येकी तीन हजार रुपये याप्रमाणे निव्वळ नफा म्हणून वाटून घ्यायचे.

लिलावातून लाखोंची उलाढाल

भिशीचे हे उदाहरण केवळ प्रातिनिधिक आहे. महिन्याला चार ते पाच लाख रुपये प्रत्येकी भरणारे अनेक भिशी मेंबर आहेत. अशा भिशीत मोठी रक्कम जमते. बसल्या बैठकीला प्रत्येक महिन्याला बहुतेकांना महिना वीस ते पंचवीस हजार रुपयांची कमाई होते. पण ज्याने लिलाव बोलून भिशी घेतली. त्याला परतफेड करताना देव आठवायची वेळ येते. मग भिशीचा हप्ता भरण्यास टाळाटाळ होते. हप्ता भरायला एक दिवस उशीर झाला तरी दिवसाला हजार दोन हजार रुपये दंड शुल्क आकारले जाते. आणि येथेच भिशीचे काळे अंतरंग दिसायला सुरुवात होते. भिशीचे पैसे वसूल करायला एक यंत्रणा राबू लागते. भिशी फुटल्यावर एका ताटात जेवणाऱ्यात एकमेकाचे गळे घोटायची भाषा सुरू होते. आणि मग प्रकरण मुद्द्यावरून  गुद्यावर येते. त्याला गुंडगिरीची जोड मिळते. आणि भिशी प्रकरणात अनेकांची धूळदाण होते.

परतफेडीस उशीर झाल्यास दिवसाला दोन हजारांचा दंड

कोल्हापुरात अशा अनेक भिशी आहेत. सर्व बेकायदेशीर आहेत. अर्थात जोवर अतिशय नियमित व व्यवस्थितपणे या भिशी चालू आहेत तेथे वातावरण जरूर चांगले आहे. भिशीचे पैसे अनेकांना चांगल्या कारणासाठी उपयोगी पडले ही आहेत. पण ज्या भिशीत दोन नंबरचा आणि गुंडगिरीतला पैसा आहे तेथे भयानक परिस्थिती आहे. दोन नंबरचा पैसा ज्यांच्याकडे आहे त्यांना भिशीतल्या कर्जाऊ पैशाची कधीच गरज नसते. मात्र ते दरमहा भिशीत पाहिजे तेवढे पैसे गुंतवतात. दरमहा जाग्यावर काही हजारात व्याज मिळवत बसतात. आणि भिशीतले जे कोणी हप्ता भरणार नाहीत त्यांच्याकडून वसुलीसाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतात.

वाचा - एक नव्हे तर तब्बल पाच परिक्षा झाला तो उत्तीर्ण... 

गुंडगिरीचा आधार घेतात. भिशी लिलावाने घेणाऱ्याच्या घरात भिशीतले सर्वजण एकत्रित जातात. कुटुंबियांवर दडपण आणतात. वसुलीसाठी त्याची गाडी ,मोबाईल, घड्याळ, दागिने काढून घेतात आणि कोठे तक्रार केली तर बघून घेतो म्हणून दम देतातही भिशी वरवर खूप गोड वाटते पण अतिशय कटू असेच याविषयीचे बहुतेकांचे अनुभव आहेत. भिशीचे व्याज भरता भरता लोक मेटाकुटीला आले आहेत. तक्रार केली तर बेकायदेशीर भिशी चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. पण भिशीत सहभागी झाला म्हणून तक्रार करणाराही आरोपी ठरू शकतो. त्यामुळे कोणी तक्रार करत नाही. आणि भिशीच्या पैशाचे कर्ज कधी फिटत नाही. भिशी प्रकरणात पोलिसांनी लक्ष घालावे अशी मागणी करणे ठीक आहे. पण अशा भिशी गल्ली, तालमीत, व्यापारी पेठेत, विविध व्यवसायिक एवढेच नव्हे तर महिला मंडळात ही आहेत.या भिशीत व्याजाच्या पैशातून सर्व मेंबरना महिन्याला चमचमीत जेवणही मिळते. पण भिशीचे पैसे भरता आले नाही तर खाल्लेले अन्न समाधानाने पचवणेही कठीण होऊन बसते. 

त्यामुळे प्रत्येक भिशी पोलिस बंद करू शकणारच नाहीत. लोकांनीच या गोड भिशीचा कटू अनुभव टाळण्यासाठी भिशीत जाणे बंद करणे हाच एक मार्ग आहे. कारण आता या भिशी प्रामाणिक लोकांच्या हातातून काळ्या धंद्यातून पैसे मिळणारयांच्या हातात गेले आहेत. महिन्याला सहजपणे व्याजाचा पैसा मिळतो म्हणून गुंडगिरी करणारे व काळ्या धंद्याचा बक्कळ पैसा असणारे अशा भिशीत उतरले आहेत. त्यामुळे लोकांनीच भिशीपासून लांब राहणे आवश्‍यक आहे.

प्रामाणिक भिशी मंडळ बदनाम

भिशी आणि लिलाव भिशीत मोठा फरक आहे. अनेक भिशी महिन्याची बचत म्हणून चालवल्या जातात. सणासुदीला अशा भिशीचे वाटप होते. त्यामुळे सणाच्या काळात बचतीची एकरकमी रक्कम हातात पडू शकते. पण लिलाव भिशी हा व्याज मिळवण्यासाठी काही जणांनी सुरू केलेला प्रकार आहे. एखाद्या गरजू व्यक्तीला समोर नोटांची बंडले ठेवून आमिष दाखवले जाते. आणि अव्वाच्या सव्वा त्याच्याकडून व्याज वसूल केले जाते. लिलाव भिशीमुळेच भिशीची प्रतिमा काळवंडली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhisi in hands of black businessmen kolhapur