मुख्यमंत्री सतत धमक्‍या देऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ; चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 November 2020

ज्यांचा झेंडा वेगळा, भूमिका वेगळी असे एकमेकांना पाण्यात पाहणारे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी अनैसर्गिक आघाडी करून सरकार बनवले

कोल्हापूर - मराठा आरक्षण, शाळांची सुरुवात, अंतिम वर्ष परीक्षा, वीज बिलाचा प्रश्‍न अशा कोणत्याच बाबतीत सरकारचे ठोस धोरण नाही. मंत्र्यांमध्ये समन्वय नाही. कोणाचा पायपोस कोणाला नाही. आजचा दिवस म्हणजे अपयशी, संवेदनाहीन आणि गोंधळलेल्या सरकारची वर्षपूर्ती आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली. राज्य सरकारला वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चंद्रकांत पाटील यांनी भूमिका मांडली. 

सरकारच्या कारभारावर टीका करताना ते म्हणाले, ‘‘ज्यांचा झेंडा वेगळा, भूमिका वेगळी असे एकमेकांना पाण्यात पाहणारे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी अनैसर्गिक आघाडी करून सरकार बनवले; पण त्यांना सरकार चालवता आले नाही. सरकारच्या उदासिनतेमुळे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. त्यातून मार्ग काढण्याऐवजी सरकारने एसईबीसी कोटाच रद्द केला. या सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली. शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली; पण अद्याप तीही पूर्ण नाही.

कोरोनाची परिस्थितीही सरकारने नीट हाताळली नाही. देशाचा मृत्यूदर १.४६ टक्के होता तर महाराष्ट्राचा मृत्यूदर २.६ टक्के होता. वीज बिलाबाबतीत तर सरकारने घुमजाव केले. यामधून सरकारमधील मंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याचे दिसले. हे सरकार म्हणजे पूर्णपणे अपयशी आणि गोंधळलेले आहे. सरकारच्या नातर्केपणामुळे सामान्य माणूस भरडला गेला. शेतकरी, विद्यार्थी, महिला, नोकरदार, उद्योजक समाधानी नाही.’’

भाजपला सत्तेचा मोह सुटत नाही या टीकेवर चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘राज्यात सर्वाधिक आमदार आणि खासदार आमचे आहेत. केंद्रात आमची सत्ता आहे. बहुतांशी राज्यात आमचे सरकार आहे. आम्हाला राज्यात सरकार नसले म्हणून फरक पडत नाही. आम्ही प्रखर विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहोत. सरकारचा नाकर्तेपणा आम्ही जनतेसमोर मांडतच राहू.’’

धाक दाखवणारे मुख्यमंत्री
जनतेला महाराष्ट्रात आश्‍वासक मुख्यमंत्री हवा होता; पण मुलाखतींमधून मुख्यमंत्री सतत धमक्‍या देऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी शब्द काळजीपूर्वक वापरले पाहिजेत. मुख्यमंत्री पदाची गरिमा राखली पाहिजे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader chandrakant patil criticism on cm uddhav thackeray and maharashtra government