sakal

बोलून बातमी शोधा

bullet village sangli bedag

सिंचन योजनांमुळे स्थैर्य अन्‌ संपन्नता आली. राजकारणही आले. बेंदुरापासून गणेशोत्सवापर्यंत राजकीय स्पर्धा दिसते.

एकेकाळी या गावात होता दुष्काळ, पण आज प्रत्येकाच्या घरासमोर आहे रुबाबदार बुलेट 

sakal_logo
By
संतोष भिसे

सांगली - वीस वर्षांपूर्वीपर्यंत दुष्काळी ओळख असलेला मिरज पूर्व भाग आता म्हैसाळ सिंचन योजनेच्या पाण्याने हिरवागार झाला आहे. फोंड्या माळावर द्राक्ष, ऊस, बागायती फुलवल्या. लक्ष्मी पाणी भरू लागली, तशी दारादारांत बैलगाडीची जागा चारचाकींनी घेतली. कालांतराने त्यातही आवडीनिवडी आल्या. बेडगकरांनी या आवडीनिवडीला वेगळाच आयाम दिला. खानदानी रुबाबदार बुलेटला आता नव्या पिढीने पसंती दिली आहे. आजमितीस गावात तीनशेंवर बुलेटची धडधड आहे. तीस-चाळीस वर्षांपूर्वी पानमळ्यांचे बेडग अशी ओळख असणारे बेडग आज बुलेटवाले बेडग झाले.

मिरजेपासून दहा किलोमीटरवरचे बेडग. अनेक अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण. लोकसंख्या सुमारे अठरा हजार. यातली साठ टक्के वस्ती गावासभोवतीच्या मळीमध्ये, अगदी पिढ्यान्‌ पिढ्या. प्रामुख्याने मराठवाड्यातील वंजारी समाज येथे मोठ्या संख्येने पूर्वांपार राहतो. या समाजाचा राजकारण आणि अर्थकारणात वरचष्मा आहे. गावात मराठा समाजाचेही प्राबल्य. सरदार नरसिंगराव रामचंद्रराव घोरपडे यांच्या सरदारकीचे गाव. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची सासूरवाडी. घोरपडेंच्या राजवाडा गावची ओळख. तो वाडा गावच्या संपन्नतेचीही चुणूक दाखवतो. वसंतदादा साखर कारखान्याने धडक सिंचन योजना राबवली; गावकऱ्यांनी तिचे सोने करून घेतले. पानमळे, ऊस, द्राक्ष, केळी आणि हळदीने शिवारे बहरली. इथे पानमळ्याची मोठी परंपरा. इथले पान मुंबईसह देशाच्या कानाकोपऱ्यात जाते. उसामुळे आता पानमळे कमी झाले; मात्र टिकून आहेत. पानमळ्यांचे दलाल म्हणूनही इथले अनेकजण अनेक बाजारपेठेत विसावले. रावणाची बहीण त्राटिका हिचे सोंग गावच्या जत्रेत निघते. अशी परंपरा जपणारे गाव दुर्मिळच. अशा खूप काही परंपरा इथे आहेत.


सिंचन योजनांमुळे स्थैर्य अन्‌ संपन्नता आली. राजकारणही आले. बेंदुरापासून गणेशोत्सवापर्यंत राजकीय स्पर्धा दिसते. प्रत्येकाचा सण आणि उत्सव वेगळा. आता यात भर पडली आहे ती दणकेबाज बुलेटची. हा प्रत्येकाचा स्टेटस्‌ सिबॉल झालाय. ईर्षेतून बुलेटची संख्या वाढत गेली. आजघडीला शेतकामासाठी ट्रॅक्‍टर कदाचित दारात नसेल, पण बुलेट मात्र आहे. चारचाकीच्या जोडीला बुलेट हवीच, अशी प्रत्येकाची धारणा. चार वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी विक्रम केला. दिवसांत चक्क वीस बुलेट गावात आल्या तेही ईर्षेपोटीच. असले हौशी गाव बघायला बुलेटच्या कंपनीचे लोक गावात आले. 

गावात एकत्र कुटुंबांची संख्या मोठी आहे; चुली वेगळ्या असल्या तरी वाडा एकच. साहजिकच एकेका दारात तीन-चार बुलेट उभ्या. काही लाखांची परदेशी बनावटीची चारचाकी घरात असली तरी शेजारी भारतीय बनावटीची बुलेट हवीच. शिक्षणामुळे सरकारी नोकऱ्यांत उच्चपदस्थ वाढले. पैसा आला. पुन्हा बुलेट आली. तुम्ही संध्याकाळी अर्धा तास बेडगच्या मरगाई मंदिर किंवा राजवाडा चौकात थांबलात त्याची प्रचिती येते. अर्धा तासात डझनभर बुलेट नक्की तुमच्यासमोरून धडधडत जातील. त्यामुळे बुलेटचं बेडग अशी ओळख झाली आहे. 


सजावटीवर 50 हजार!

दीड ते दोन लाखांत बुलेट घरात येते. बेडगकर त्यातही हौसमौज करतात. मॅकव्हील, हॅण्डल, जादा रंगीबेरंगी दिवे, विशेष आवाज देणारा सायलेन्सर, हेडलाईट गार्ड यासाठी पुन्हा पाच-पन्नास हजारांचा खर्च होतो. स्टॅण्डर्ड, क्‍लासिक, थंडरबर्ड अशा विविध मॉडेलच्या बुलेट येथे आहेत. तरुणांचा ओढा लाल-निळ्या थंडरबर्डकडे आहे. बुलेटचं वेड इतक रुळलयं की सलून चालवणारा पोपट गंगधर सकाळी बुलेटवरूनच दुकानात येतो. चिकन सेंटर चालवणारे केरबा साळुंखे आणि शेती करणारा सुनील खाडे या तरुणांसाठी बुलेट म्हणजे स्टेटस्‌ सिम्बॉल. नव्या पिढीतला उमेश कोळी लालभडक बुलेटवरून गावात फेरी मारतो तेव्हा बेडगकरांचा बेधडकपणा नजरेस येते. गाडीसाठी जंपींग फॅन्सी नंबरचा आटापिटाही बेडगकरांनी यशस्वी केलाय.

हे पण वाचाया गावातील पोरं लय हुशार ;  गावात इतकेजण झाले इंजिनिअर 

"शेजारणीच्या नव्या साडीबाबत महिलांमध्ये जशी स्पर्धा असते, तशीच इथे बुलेटबाबत आहे. नवी पिढी शेतीत घाम गाळते आणि बुलेटचा शौकही करते. दिवसभर पानमळा, द्राक्षबागेत काम केल्यानंतर बुलेटवरून येणारा शेतकरी आमच्या अभिमानाचा भाग आहे.'' 
-संभाजी पाटील, ग्रामस्थ

 "नव्या पिढीचे बुलेटप्रेम गावची शान वाढवणारे आहे. सरदार नरसिंगराव रामचंद्रराव घोरपडे यांची जहागिरी असलेल्या बेडग गावात गावकऱ्यांनी अनेक बाबतीत सरदारांचा हा खानदानीपणा जपला आहे. बुलेटसह अनेक वाहनांमधून तो दिसतो.'
-दिलीप बुरसे, माजी सभापती, द्राक्ष बागायतदार

तोरा मिरवायचा!

बुलेट म्हणजे बंदुकीची गोळी. क्षणात वेध घेणारी. बेडगची संस्कृतीही अशीच. धाडसी अन्‌ वेध घेणारी. टोकाच्या राजकीय संघर्षात तोरा मिरवायचा तर बुलेट हवीच!

संपादन - धनाजी सुर्वे

go to top