29 वर्षांत 16 आयुक्तांच्या गाडीचे केले सारथ्य 

बुधवार, 1 जुलै 2020

महापालिकेत तब्बल 29 वर्षे सेवा, त्यातील 27 वर्षे आयुक्तांचे चालक आणि या काळात एक-दोन नव्हे तर 16 आयएएस अधिकाऱ्यांचे सारथ्य करण्याचे काम केलेले महापालिकेचे चालक बाजीराव शामराव चौगले (वय 58) आज महापालिकेतून निवृत्त झाले.

कोल्हापूर : महापालिकेत तब्बल 29 वर्षे सेवा, त्यातील 27 वर्षे आयुक्तांचे चालक आणि या काळात एक-दोन नव्हे तर 16 आयएएस अधिकाऱ्यांचे सारथ्य करण्याचे काम केलेले महापालिकेचे चालक बाजीराव शामराव चौगले (वय 58) आज महापालिकेतून निवृत्त झाले. आज आयुक्तच रिटायर झाले, अशीच चर्चा त्यांच्या सहकाऱ्यांत आणि मित्र परिवारात सुरू होती. 

आज महापालिकेत महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, नगरसेवक ईश्‍वर परमार यांच्यासह अनेक पदाधिकारी, नगरसेवक अधिकारी यांनी श्री. चौगले यांचा सत्कार करून त्यांना सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल निरोप देताना उर्वरित आयुष्यासाठी सदिच्छा दिल्या. 
1991 च्या सुमारास श्री. चौगले रोजंदारी चालक म्हणून नोकरीस लागले. सुरवातीची दोन वर्षे पदाधिकारी आणि इतरांकडे चालक म्हणून काम केल्यानंतर त्याची आयुक्तांच्या गाडीवर बदली झाली. गेली 27 वर्षे आयुक्तांचा चालक म्हणून काम करताना त्यांनी अनेक संकटांचा आणि आव्हानांचाही सामना केला. पृथ्वीराज बायस यांच्यापासून ते आताचे आयुक्त डॉ. कलशेट्टी यांच्यापर्यंत चालक चौगलेच. 
पृथ्वीराज बायस, व्ही. के.जयरथ, बिपिन मलीक, राजगोपाल देवरा, कुणालकुमार, विजय सिंघल, विजयालक्ष्मी बिदरी, पी. शिवशंकर, अभिजित चौधरी आणि आता डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी अशा 16 आयुक्तांचे त्यांनी सारथ्य केले. सलग एवढी वर्षे चालक म्हणून मोठ्या अधिकाऱ्यांसोबत राहणे, तशी आव्हानात्मक गोष्ट पण चौगले यांनी ते आव्हानही पेलले. 
आयुक्तांचे चालक म्हणून श्री. चौगले यांच्या कामाची चर्चा महापलिकेत होते. विशेष म्हणजे मोठ्या आयएएस अधिकाऱ्यांचा त्यांनी विश्‍वास संपादन केल्यामुळे आयुक्त म्हणून कोणीही येऊ दे, त्यांच्या वाहनावर चालक म्हणून श्री. चौगले यांची नियुक्ती ठरलेलीच. आज ते या सेवेतून निवृत्त झाले. महापालिकेत त्यांच्यासह भूपाल रामचंद्र तराळ, युसूफ ह. उस्ताद, अशोक गोविंद साळोखे, तुकाराम गोपाळ भोसले, चंद्रकांत मारुती खांडेकर, बाळू भिवा गणेशाचार्य हेही महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांचाही सत्कार महापौर आजरेकर यांनी केला.