दलालांकडूनच्या फसवणुकीने काजू, रताळी उत्पादक हवालदिल

सुनील कोंडुसकर
Wednesday, 16 December 2020

चंदगड तालुक्‍याच्या सर्वच भागांत गव्यांनी, तर पश्‍चिम भागात गव्यांबरोबरच हत्तींनी उच्छाद मांडला आहे. सातत्याने वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे जंगल हद्दीलगत जमीन मोठ्या प्रमाणात पडीक ठेवली जात आहे.

चंदगड : तालुक्‍याच्या सर्वच भागांत गव्यांनी, तर पश्‍चिम भागात गव्यांबरोबरच हत्तींनी उच्छाद मांडला आहे. सातत्याने वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे जंगल हद्दीलगत जमीन मोठ्या प्रमाणात पडीक ठेवली जात आहे. एका बाजूला वन्यप्राणी, तर दुसऱ्या बाजूला दलालांकडून होणारी फसवणूक सध्या शेतकऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करणारी ठरत आहे. काबाडकष्टाने उत्पादित केलेला माल दलालांकडून फसवणूक करून उचल केला जात असल्याचे दुःख सर्वाधिक आहे. हत्ती, गवे परवडले परंतु दलाल नको, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. 

शहर तसेच परप्रांतातून येणारे व्यापारी सुरवातीला उत्तम व्यवहार ठेवतात, परंतु मध्येच एखाद्या वेळी सर्व माल घेऊन पोबारा करतात. त्यांचा ठावठिकाणा सापडत नाही. पोलिस यंत्रणेकडूनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. गतवर्षी काजूप्रक्रिया उद्योजकांना एका व्यापाऱ्याने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. यामुळे अनेक उद्योग कोलमडले. त्याचा परिणाम सर्वसामान्य कुटुंबातील महिला मजुरांवर झाला. उद्योग बंद पडल्याने त्यांचा रोजगार बंद झाला.

दोन महिन्यांपूर्वी रताळी उत्पादकांचीही अशीच फसवणूक झाली. पुण्याहून आलेल्या व्यापाऱ्यांने सातवणे परिसरातील गावात जाऊन लाखो रुपयांचा माल खरेदी केला. संचारबंदीचे कारण पुढे करून बॅंकेतून मोठी रक्कम काढताना अडचणी असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना धनादेश दिले, परंतु ज्यावेळी त्यांनी हे धनादेश वठवण्यासाठी बॅंकेशी संपर्क साधला, त्यावेळी संबंधितांच्या खात्यावर रक्कम नसल्याचे स्पष्ट झाले. केवळ शेतीवर आधारित प्रपंच चालवणाऱ्या शेतकऱ्यांना गुंतवणूक केलेली रक्कमसुद्धा पदरात पडत नसल्याने मानसिक खच्चीकरण होते. शेतकऱ्यांची फसवणूक हा गंभीर विषय असून, त्याबाबत कडक कारवाईची गरज आहे. 

कडक कारवाई करावी
नाशिवंत माल वेळेत उचल व्हावा, या हेतूने शेतकरी दलालांच्या जाळ्यात अडकतात. फसवणूक झाल्यास मनाने खचतात. कष्टकऱ्यांच्या श्रमावर डल्ला मारणाऱ्या कडक कारवाई करावी. 
- नागेश गुरव, सातवणे 

 

संपादन - सचिन चराटी

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cashew And Sweet Potato Growers Are Worried About Fraud By Brokers Kolhapur Marathi News