कोरोना काळात गरोदर मातांची हेळसांड टाळण्यासाठी गडहिंग्लजला असे केले नियोजन, वाचा सविस्तर

अवधूत पाटील
Saturday, 12 September 2020

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नॉन कोविड रुग्णांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर गरोदर मातांची हेळसांड होणार नाही याची खबरदारी म्हणून येथील पंचायत समितीत बैठक झाली.

गडहिंग्लज : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नॉन कोविड रुग्णांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर गरोदर मातांची हेळसांड होणार नाही याची खबरदारी म्हणून येथील पंचायत समितीत बैठक झाली. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश असणाऱ्या रुग्णालयांना प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय गरोदर मातांची विभागणी करून देण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत रुग्णालयाच्या दारातून रुग्ण परत जाणार नाही याचे नियोजन करण्यात आले. यामाध्यमातून प्रसूती वेदना सुसह्य करण्याचा प्रयत्न केला आहे. पंचायत समितीच्या सभापती रूपाली कांबळे अध्यक्षस्थानी होत्या. 

गटविकास अधिकारी शरद मगर यांनी बैठकीचा हेतू स्पष्ट केला. गरोदर मातांची गावनिहाय यादी तयार आहे. प्रसूतीबाबत रुग्णालयांमध्ये समन्वय रहावा यासाठी नियोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. "संत गजानन'चे विश्‍वस्त डॉ. यशवंत चव्हाण यांनी यापूर्वी सिझर झालेले रुग्ण रात्री-अपरात्री पाठविण्याऐवजी आधी पाठवावेत म्हणजे ऐनवेळी अडचण होणार नसल्याची सूचना मांडली. रेडेकर संस्था समूहाचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर यांनी नोडल ऑफिसरना गरोदर मातांच्या थेट घरी जाऊन सेवा पुरविण्याचे आश्‍वासन दिले. 

महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी आवश्‍यक कागदपत्रांची आताच तपासणी करून घेण्याची सूचना मगर यांनी केली. सदस्य विद्याधर गुरबे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. एस. आंबोळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. व्ही. अथणी यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

असे आहे नियोजन... 
- कडगाव, हलकर्णी, नूल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गरोदर मातांना केदारी रेडेकर रुग्णालयात, तर मुंगूरवाडी, महागाव, कानडेवाडी केंद्राच्या कार्यक्षेत्रातील गरोदर मातांना संत गजानन महाराज हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी पाठविणे. 
- रेडेकर रुग्णालय व संत गजानन हॉस्पिटलमध्ये नोडल ऑफिसरची नेमणूक करणे. 
- गरोदर मातांची 15 दिवस आधी स्वॅब तपासणी. ऐनवेळी गरज भासल्यास अँटिजेन टेस्ट केली जाणार. 
- गरोदर मातांसाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात 100 अँटिजेन टेस्टच्या किट रिझर्व्ह ठेवणे. 
- आजरा तालुक्‍यातील रुग्ण रेडेकर रुग्णालयात, तर चंदगडचे रुग्ण संत गजानन हॉस्पिटलमध्ये पाठविणार. 

दोन महिन्यात 226 संभाव्य प्रसूती... 
बैठकीत सप्टेंबर व ऑक्‍टोबर या दोन महिन्यात होणाऱ्या संभाव्य प्रसूतींचा आढावा घेण्यात आला. तालुक्‍यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यामध्ये एकूण 226 संभाव्य प्रसूतींची नोंद झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय संभाव्य प्रसूतींची संख्या अशी; कडगाव 57, महागाव 33, हलकर्णी 37, कानडेवाडी 26, नूल 50, मुंगूरवाडी 23.

 

संपादन - सचिन चराटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Center-Wise Planning At Gadhinglaj To Avoid Neglect Of Pregnant Mothers During The Corona Period Kolhapur Marathi News