सीईटीची मार्गदर्शक तत्वे जाहीर, 30-31 ला होणार परीक्षा 

मिलिंद देसाई | Wednesday, 22 July 2020

परीक्षा काळात विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग केले जाणार आहे.

बेळगाव : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दहावी परीक्षे प्रमाणेच 30 आणि 31 जुलै रोजी होणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी आवश्‍यक त्या उपाय योजना करण्याचा निर्णय कर्नाटक परीक्षा प्राधिकारने घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांसाठी आवश्‍यक मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. 

या परीक्षेसाठी इतर विभागांच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार असून बेळगाव शहरातील 14, चिक्‍कोडी येथील 3 व खानापूर वगळता प्रत्येक तालुक्‍यातील एका परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार आहे. 

परीक्षा काळात विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग केले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर सुरु होण्यापूर्वी एक तास अगोदर परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहावे लागणार असून यंदा कोरोनाच्या संकटामुळे परीक्षार्थींना विविध प्रकारच्या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागणार आहे. परीक्षा केंद्रावर केले जाणारे थर्मल स्कॅनिंग आणि इतर बाबतची माहिती विद्यार्थ्यांना देण्याची सूचना कर्नाटक परीक्षा प्राधिकारण केली आहे. पेपरला सकाळी 10.30 वाजता सुरुवात होणार आहे. मात्र विद्यार्थी वेळेवर आले तरच सामाजिक अंतर राखण्यासह थर्मल स्कॅनिंग करण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग करण्यासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. 30 जुलै रोजी सकाळी 10.30 ते 11. 50 यावेळेत जिवशास्त्र तर दुपारी 2.50 ते 3. 50 यावेळेत गणित तर 31 जुलै रोजी सकाळच्या सत्रात भौतीक शास्त्र तर दुपारच्या सत्रात रसायन शास्त्र या विषयांचे पेपर होणार आहेत. 

हे पण वाचा - पती -पत्नीचा एकाच दिवशी मृत्यु 

 

कर्नाटक परीक्षा प्राधिकरणने केलेल्या सूचना 

1. विद्यार्थ्यानी स्वत: पाणी, सॅनिटायझर्सची बाटली, छत्री व जेवणाचा डबा आणावा. 

2. शौचालयात स्वच्छतेबरोबर साबण, हॅण्डवॉश, सॅनिटायजर्सची सोय करावी. 

3. प्रत्येक केंद्रावर दोन पोलिसांची नेमणूक करावी. 

4. ने-आण करणाऱ्या बसचे निर्जंतुकीकरण करावे. 

5. केंद्रावर आरोग्य तपासणी केंद्र तयार करावे. 

6. सामाजिक अंतर राखण्यासाठी वर्ग खोल्यांची संख्या वाढवावी. 

7. मूल्यमापन केंद्राचे निर्जंतुकीकरण करावे. 

8. प्रत्येक केंद्रावर सूचना फलक बसवावा.