चंदेरनगरीची झळाळी कोरोनामुळे काळवंडतेय

बाळासाहेब कांबळे
Sunday, 19 July 2020

शहरात कोरोना संसर्ग रुग्णांचा ओघ वाढतच असून आज एकाच दिवशी तब्बल 18 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये एक चांदी उद्योजक, एक माजी स्वीकृत नगरसेवक व त्यांचे नातेवाईक, एका नामांकीत विद्यमान नगरसेवकाचा मुलगा आदींचा समावेश आहे.

हुपरी (कोल्हापूर)  ः शहरात कोरोना संसर्ग रुग्णांचा ओघ वाढतच असून आज एकाच दिवशी तब्बल 18 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये एक चांदी उद्योजक, एक माजी स्वीकृत नगरसेवक व त्यांचे नातेवाईक, एका नामांकीत विद्यमान नगरसेवकाचा मुलगा आदींचा समावेश आहे. त्यामुळे येथील बाधितांची संख्या 28 झाली असून उच्चभ्रू वस्तीतील सूर्या कॉलनी, माळभागातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने शहरावरील कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. 
तीन दिवसांत 27 पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याने नागरिकात धाकधूक वाढली आहे. बाधित कोरोना रुग्णांमध्ये तळंदगे रोड 3, बाजारपेठ हनुमान मंदिर 2, विठ्ठल चौक 5, महाराणा प्रताप चौक 2, अंबाबाई कमान 1, सूर्या कॉलनी 1, तळंदगे वेस 1 व माळभागातील 94 प्लॉट 1, एका साखर कारखान्याचे कोल्हापूरस्थित पण इथला पत्ता असणारे 2 कर्मचारी अशा 18 जणांचा समावेश आहे. कल्याण येथून येथे कांही दिवसांपूर्वी आलेल्या 50 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 
विठ्ठल चौक व हनुमान मंदिर भागातील बाधित रूग्ण हे आधीच्या कोरोनाग्रस्त रूग्णांचे नातेवाईक असून यात दोन महिला आहेत. दरम्यान, बाधित भागात कन्टेन्मेंट झोन लागू करण्यात आला आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांची कोरोना चाचणी घेण्यासाठी पालिका व आरोग्य यंत्रणे कडून प्रयत्न सुरू होते. 

पोलिस अधिकारी क्वारंटाईन 
दरम्यान, कारखान्याचे संचालक असलेले विद्यमान नगरसेवक व एक माजी स्वीकृत नगरसेवक एकमेकांचे जवळचे मित्र आहेत. ते दोघेही पॉझिटिव्ह आहेत. दोघेही एका पोलिस अधिकाऱ्याच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्या पोलिस अधिकारने स्वतःहूनच अतिग्रे येथील केंद्रात क्वारनटाईन होत स्वॅब दिला आहे. 

रेंदाळमध्ये दिवसभरात 
चौघे कोरोना पॉझिटिव्ह 

रेंदाळ येथे आज दिवसभरात चौघे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बाधित चौघांपैकी तिघे एकाच कुटुंबातील आहेत. त्यामुळे रेंदाळ ग्रामस्थांची धास्ती वाढली आहे. पंधरा दिवसांपूर्वी रेंदाळ येथील वडील व मुलगा व त्यानंतर राजकीय नेता असे तिघे जण पॉझिटिव्ह आढळले होते. आज दिवसभरात चौघा जणांना कोरोना लागण झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले. बाधित व्यक्तीच्या संपर्कातील लोकांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सहायक अधिकारी जे. के. कांबळे यांनी सांगितले.

संपादन - रंगराव हिर्डेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandernagari's splendor is blackened by corona