कोणी ऊस उचल करता का ऊस, चंदगडला शेतकऱ्यांची आर्त हाक

सुनील कोंडुसकर
Tuesday, 12 January 2021

चंदगड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील ऊस उत्पादक शेतकरी वन्य प्राण्यांच्या उपद्रवाने हवालदिल झाले आहेत. वर्षभर कष्ट उपसून पिकवलेल्या ऊस पिकातून हत्ती, गव्यांकडून दररोज नुकसान करण्याचे काम सुरू आहे.

चंदगड : तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील ऊस उत्पादक शेतकरी वन्य प्राण्यांच्या उपद्रवाने हवालदिल झाले आहेत. वर्षभर कष्ट उपसून पिकवलेल्या ऊस पिकातून हत्ती, गव्यांकडून दररोज नुकसान करण्याचे काम सुरू आहे. हे नुकसान पाहवत नाही. तालुक्‍यात तीन साखर कारखाने असून एकाही कारखान्याने या विभागात तोडणी टोळ्या न पाठवल्याने दररोज नुकसानीत भर पडत आहे. "कोणी ऊस नेता का ऊस?' अशी आर्त हाक या विभागातील शेतकरी देत आहे. 

जांबरे, उमगाव, न्हावेली, कोकरे, अडुरे, पेडणेकरवाडी ही तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातली कोकण सीमेवरची गावे. पाण्याची उपलब्धता झाल्याने उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे; परंतु कष्टाने उभारलेले पीक कारखान्याला जाईपर्यंत शेतकऱ्याला वणवण करावी लागते. शेतीची मशागत, पिकासाठी खुरपणी, खतांचा खर्च विचारात घेता वेळेत पीक गेले तर चार पैसे मिळतात म्हणून शेतकऱ्याची लगबग सुरू असते.

ऊस घालवताना येणाऱ्या अडचणी पाहून हे पीक न केलेले बरे, अशीही त्याची मानसिकता होते; परंतु नगदी पीक म्हणून अन्य पिकांपेक्षा ते परवडणारे असल्याने नाइलाजाने त्याला हे पीक घ्यावे लागते. सध्या या विभागात चार हत्तींचा वावर आहे. गव्यांच्या कळपाचा तर हिशेबच नाही. हत्तींकडून पीक खाण्याबरोबरच पायाखाली सापडून भुईसपाट होते. गव्यांचा कळप पिकातून गेला की बघता बघता दीड-दोन गुंठ्यातील पिकाचे नुकसान होते.

दररोज होणारे नुकसान पाहता या विभागातील ऊस उचलीला कारखान्यांनी प्राधान्य द्यावे, अशी मागणी आहे. वन विभागाकडून कारखान्यांना तशी पत्रेही पाठवण्यात आली आहेत; परंतु कारखाने त्याकडे लक्ष देत नाहीत. नफेखोरीच्या नियमांपुढे शेतकऱ्यांचे हित मागे पडते. सातत्याने कारखान्यांकडे खेटे मारणारा शेतकरी ऊस उचलीसाठी आर्त हाक देत आहे. त्याला कारखान्यांकडून प्रतिसाद मिळणार का, हाच खरा प्रश्‍न आहे. 

ऊस न करण्याचा निर्णय
एक एकरात ऊस पीक घेतले आहे. दररोज गव्यांकडून किमान दोन गुंठ्याचे नुकसान सुरू आहे. कारखान्यांनी ऊस उचल केला असता तर हे नुकसान टळले असते. पुढील वर्षी ऊस न करण्याचा निर्णय घेतला आहे. 
- नारायण सुभेदार, ऊस उत्पादक शेतकरी, न्हावेली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandgad Farmers Worried Over Non-Lifting Of Sugarcane Kolhapur Marathi News