कोल्हापुुरातील माळरानावरच्या रुग्णालयाने दिले अनेकांना जीवनदान

change identity of the isolation hospital; Support for the common man
change identity of the isolation hospital; Support for the common man

आर. के. नगर (कोल्हापूर) : पूर्वी आयसोलेशन रुग्णालयात जायचे म्हटले, की अनेकांच्या कपाळावर आठ्या उभ्या राहायच्या. कावीळ झाल्यानंतर उपचारासाठी कुठे जायचे तर आयसोलेशन, इतकीच या रुग्णालयाची ओळख. गरिबांनी जायचे कुठे, तर आयसोलेशनमध्ये. रिंगरोडवरून एखादी गाडी भरधाव वेगाने गेली तर रुग्णालयाकडे पाहण्याचेही कुणाचे धाडस होत नव्हते. आता मात्र ज्यांच्या खिशात पैसे नाहीत त्यांनाही आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्यासाठीही आयसोलेशन आधारवड ठरले आहे. कालपरवापर्यंत कावळीवर उपचार करणारे हे रुग्णालय आता शहरातील एक महत्त्वाचे कोविड रुग्णालय बनले आहे. कावीळ ते कोविड या प्रवासात गोरगरिबांना मोफत उपचार, हाच या रुग्णालयाचा मूळ उद्देश राहिला आहे.
 

कोविडच्या संकटकाळात आयसोलेशनमध्ये ज्या पद्धतीने उपचारपद्धती सुरू झाली ते पाहता रुग्णालयाची गणना आता शहरातील टॉप रुग्णालयात होऊ लागली आहे. आयसोलेशन अर्थात उपचार आणि विश्रांती यासाठी सर्वोत्तम पर्याय होतो. मात्र, येथे उपचार घ्यायचे ते महापालिकेच्या वर्ग चारमधील कर्मचाऱ्यांनी आणि ज्यांचे हातावरचे पोट आहे, अशाच लोकांसाठी हे हॉस्पिटल उभे होते. वर्षानुवर्षे रुग्णालयाच्या वाट्याला एकाकीपण आले. मार्चपासून कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि आयसोलेशनचे महत्त्व वाढत गेले.

किणी टोल नाक्‍यावर गाडी अडविल्यानंतर स्वॅब देण्यासाठी आयसोलेशनचा पर्याय देण्यात आला. क्वारंटाईन सेंटर म्हणूनही त्याचा वापर होऊ लागला. कधीकाळी माळरानावरील रुग्णालय अशी ओळख असलेल्या आयसोलेशनच्या आवारात गर्दी वाढू लागली. येथील नर्सिंग स्टाफ धोका पत्करून सेवा बजावू लागला. घरी गेल्यानंतर आयसोलेशनमध्ये कामाला आहे म्हटल्यावर अनेकजण दूर जाऊ लागले. तरीही अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी मागे वळून पाहिले नाही. एरवी महापालिकेला डागडुजी करा म्हटले तरी त्याला काही काळ निघून जायचा. कोविडच्या काळात सुमारे ५० लाख रुपये खर्चून इमारतीचे विस्तारीकरण केले. तसेच रुग्णालयात आवश्‍यक यंत्रसामुग्रीही बसविली असून आता हे रुग्णालय शंभर बेडचे झाले आहे. यामध्ये ४८ खोल्या आणि ५० बेडचा वॉर्ड तयार झाला आहे.  येथे नॉर्मल बेड तसेच ऑक्‍सिजन बेडची सुविधा आहे. 


काही खासगी रुग्णालयांचे बिलाचे आकडे पाहून घाम फुटावा अशी स्थिती असताना आयसोलेशनमध्ये मात्र नाममात्र शुल्कात कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. स्वॅब घेणे, त्याचा अहवाल, रुग्णांवर उपचार, खाण्यापिण्याची व्यवस्था, असा ताण रुग्णालय व्यवस्थापनावर आहे.

दृष्टिक्षेपात रुग्णालय
  इमारत विस्तारीकरणासाठी खर्च : ५० लाख
  ४८ खोल्या आणि ५० बेडचा वॉर्ड तयार
  नॉर्मल तसेच ऑक्‍सिजन बेडची सुविधा
  नाममात्र शुल्कात कोविड रुग्णांवर उपचार

सर्वांनी सहकार्य केल्यामुळे या रुग्णालयात चांगल्या सुविधा निर्माण करता आल्या आणि हे रुग्णालय कोविड डेडिकेटेड रुग्णालय म्हणून नागरिकांना सेवा देत आहे.
- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त, मनपा

संपादन -  अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com