भावा... फटाके वाजवाचे नाहीत तर फटाके खायचे!

मतीन शेख
Saturday, 14 November 2020

रॉकेट,बॉम्ब,बंदुक,भुईचक्कर अशा विविध चॉकलेट फटाक्याच्या प्रतिकृती...

कोल्हापूर - दिवाळी म्हणलं की फराळाची रेलचेल,पणत्यांची मांदियाळी अन् बच्चे कंपनीच्या आकर्षणाचा केंद्र असणारी फटाक्याची आतिषबाजी.
परंतू मोठ्या आवाजाच्या आणि प्रदुषण पसरविणाऱ्या फटाक्यांना फाटा देत यंदाची दिवाळी साजरी करण्याचा निर्णय अनेकांनी घेतलाय; पण मग मुलांच्या हट्टाचं काय? तर त्यावर पर्याय म्हणून यंदा बच्चे कंपनीसाठी चॉकलेट फटाके मिठाईचे आगमन झाले आहे.कोल्हापुरातील मंगळवार पेठत राहणारे संतोष व प्राजक्ता शिंदे या दाम्पत्याने फटाक्याच्या प्रतिकृतीचे चॉकलेट बनवण्याच्या प्रयोग केला आहे.याला बच्चे कंपनी कडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 

 

रॉकेट,बॉम्ब,बंदुक,भुईचक्कर असे चॉकलेट फटाके...

लॉकडाऊन मध्ये शिंदे दाम्पत्याची पुण्यातील नोकरी गेली आणि त्यांना कोल्हापूरला परतावं लागलं.या दिवाळीत बसुन काय करायचं असा प्रश्न पडल्यावर त्यांना फाटाके चॉकलेट बनवण्याची कल्पना सुचली.बाजारातून चॉकलेट पेस्ट,सुका मेवा हे साहित्य आणत  घरीच पाककला सुरु केली.या साहित्याचं मिश्रण एकत्रित करुन त्यांनी फटाक्याच्या आकाराच्या साच्यामध्ये टाकत त्यांना आकार दिला आणि हा प्रयोग यशस्वी झाला.रॉकेट,बॉम्ब,बंदुक,भुईचक्कर अशा विविध चॉकलेट फटाक्याच्या प्रतिकृती त्यांनी तयार केल्या आहेत.या प्रतिकृतींना ते फटाकांचे रुप देऊन रंगबेरंगी कागदात पॅक करतात.तसेच याचे गिफ्ट बॉक्स तयार करतात.

 
चॉकलेट फटाके गिफ्ट देण्याला पसंती...
 
या फटाके चॉकलेटचे फोटो त्यांनी व्हॉट्स अॅप, फेसबुकवर टाकताच लोकांकडून याची विचारणा होऊ लागली.लोकांच्या मागणीला प्रतिसाद देत अधिक चॉकलेटची निर्मिती त्यांनी सुरु केली आहे.नातेवाईक, मित्र परिवारासह शहरातील लोकांकडून त्यांना सध्या ऑर्डर्स मिळत आहेत.लहान मुलांना फटाक्यांपासून दुर ठेवत हे चॉकलेट फटाके गिफ्ट देण्याला पसंती दिली जात आहे. तसेच पाहुण्यांना ऑफीस मधिल सहकार्यांना भेट देण्यासाठी देखील हे पॅकेट दिले जात आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच प्रदुषण टाळण्यासाठी या चॉकलेट फटाक्यांच्या निर्मितीचा शिंदे दाम्पत्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे.
 

 

अशी आहे चॉकलेट फटाक्यांची किंमत...

  • १० चॉकलेटचे १ पॅकेट - १०० रुपये किंमत
  • दिवसाला ३० ते ४० पॅकेटची येते ऑर्डर 
  • व्हॉट्स अॅप वर दिली जाते ऑर्डर आणि ऑनलाईन पेमेंट

 

लहान मुलांना चॉकलेट आवडतात.त्याच्या फटाक्यांच्या हट्टाला हा पर्याय चांगला ठरु शकतो असा आम्ही विचार केला.आम्ही निर्मीती सुरु केली आणि लोकांचा,लहान मुलांचा याला प्रतिसाद मिळत आहे.
 - संतोष व प्राजक्ता शिंदे
 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chocolate crackers made in kolhapur