Photo : 'जगात भारी आम्ही कोल्हापुरी'... जनता‌ कर्फ्यूला सन्नाटा...

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 22 मार्च 2020

कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी पुकारलेल्या ‌जनता‌ कर्फ्युमुळे शहराने आज कमालीचा शुकशुकाट अनुभवला. दुकानांचे शटरडाऊन, घरांचे दरवाजे बंद, तर रस्ते सामसूम असे चित्र पाहायला मिळाले

कोल्हापूर : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी पुकारलेल्या ‌जनता‌ कर्फ्युमुळे शहराने आज कमालीचा शुकशुकाट अनुभवला. दुकानांचे शटरडाऊन, घरांचे दरवाजे बंद, तर रस्ते सामसूम असे चित्र पाहायला मिळाले. जनता कर्फ्यू नेमका असतो कसा, याची प्रचिती शहरवासियांना आली. उपनगरातील रस्त्यांवरही जबरदस्त शांतता होती. एखादं-दुसरे वाहन रस्त्यावर दिसल्यावर पोलिसांकडून ‌वाहनधारकांची चांगलीच हजेरी घेतली जात होती. 

 गजबजलेला दाभोळकर काॅर्नर सुनसान....

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यूची हाक दिली होती. त्याला प्रतिसाद कसा मिळतो, याची उत्सुकता होती. आज जनता कर्फ्यू असल्यामुळे नागरिकांनी आजची कामे काल (शनिवारी) आटोपली होती. आज सकाळपासूनच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे कर्फ्यूमध्ये सहभाग नोंदवला. नागरिकांच्या बहुतांशी घरांचे दरवाजे आज उघडले नाहीत. शहरातील सर्व दुकानांचे शटरडाऊन राहिले. वाहतूक व्यवस्था बंद राहिल्याने रस्ते सुने सुने होते.
शहरातील दररोज सकाळी गजबजणारे परिसर आज सायलेंट झोनमध्ये होते. अंबाबाई मंदिर, कपिलतीर्थ मार्केट, गंगावेस, रंकाळा स्टँड, संभाजीनगर बसस्थानक, रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टँड परिसरात सकाळी वर्दळ अनुभवायला मिळते. आजच्या कर्फ्युमुळे या परिसरात कमालीची शांतता होती. ग्रामीण भागातून शहराकडे येणारी वाहतूक बंद होती. 

संभाजीनगर बस स्थानक परिसरातील शुकशुकाट..

हेही वाचा- जुनी धामणीत दोन गटात राडा

ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त...
शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त होता. चौका- चौकातील पोलीस एखाद दुसरे वाहन रस्त्यावर दिसली कि संबंधित वाहनधारकांची चौकशी करत होते. त्याच्या कामाचे स्वरूप ऐकून त्याला खडे बोल सुनावत होते. एखादा नातेवाईक रुग्णालयात अॅडमिट असेल तरच त्याला जाण्याची परवानगी ते देत होते.

मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम परिसरातील स्थिती

हेही वाचा- खबरदारी! तिघे विदेशी उतरताच घेतले ताब्यात

उपनगरांत सन्नाटा...
शहरालगत असलेल्या उपनगरांत सकाळपासूनच सन्नाटा होता. हातावरचे पोट असणारा वर्ग घरातच थांबून होता. गल्लीबोळातील महिलांचा रोजचा कलकलाटही ऐकायला मिळाला नाही. लहान मुले- मुली यांना घराबाहेर पडण्यास पालकांनी मज्जाव केल्याने तीसुद्धा घरात टी.व्ही.समोर बसली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The city experienced an immense welcome today due to the janta curfew kolhapur marathi news