इचलकरंजीत पेमेंटधाराबाबत क्‍लॉथ मॅन्युफॅक्‍चरिंग आक्रमक

पंडीत कोंडेकर
Thursday, 22 October 2020

ग्रे कापडाची नव्याने ठरलेली पेमेंटधारा मोडण्याचा घाट काही व्यापारी व ट्रेडिंगधारकांनी घातला आहे.

इचलकरंजी : ग्रे कापडाची नव्याने ठरलेली पेमेंटधारा मोडण्याचा घाट काही व्यापारी व ट्रेडिंगधारकांनी घातला आहे. त्या विरोधात इचलकरंजी क्‍लॉथ मॅन्युफॅक्‍चरिंग असोसिएशन आक्रमक झाली आहे. यासंदर्भात तक्रार आलेल्या ठिकाणी जाऊन पदाधिकाऱ्यांनी पेमेंटधाराचे तंतोतंत पालन करण्याची सक्त सूचना संबंधितांना केल्या. 

शहरात ग्रे कापडाची पेमेंटधारा वाढत गेली होती. 90 ते 150 दिवसांपर्यंत व्यापारी कापडाचे पेमेंट करीत होते, परंतु सुताचे पेमेंट मात्र 8 ते 10 दिवसांत द्यावे लागत होते. यामुळे यंत्रमाग कारखानदार अडचणीत आला होता. या पार्श्‍वभूमीवर यंत्रमागधारक संघटना व उद्योगातील प्रमुख नेते मंडळी यांनी इचलकरंजी क्‍लॉथ मॅन्युफॅक्‍चरिंग असोसिएशनची स्थापना केली आहे. 

असोसिएशनच्या माध्यमातून ग्रे कापडाची व मजुरीची पेमेंटधारा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये 1 ते 30 दिवसांपर्यंत केली आहे. याची अंमलबजावणी 15 जुलैपासून केली आहे. ठरलेल्या पेमेंटधारानुसारच सध्या कामकाज सुरू आहे, मात्र काही व्यापाऱ्यांनी ठरलेल्या पेमेंटधारामध्ये बदल करण्यास सुरुवात केली होती.

अशा तक्रारी यंत्रमागधारकांकडून असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडे आल्या आहेत. याची दखल घेऊन काही व्यापारी व ट्रेडिंगचालकांच्या कार्यालयास भेटी देऊन ठरलेल्या पेमेंटधारेची तंतोतंत अंमलबजावणी करण्याची सूचना पदाधिकाऱ्यांनी केली. यापुढे पेमेंटधाराबाबत तक्रार आल्यास आक्रमक भूमिका घेउन संबंधितांवर कारवाई करावी लागेल, असा स्पष्ट शब्दात इशारा दिला. 

पदाधिकाऱ्यांत सतीश कोष्टी, पुंडलिक जाधव, सागर चाळके, पांडुरंग धोंडपुडे, विनय महाजन, विनोद कांकाणी, दत्तात्रय कनोजे, चंद्रकांत पाटील, रफिक खानापुरे, पांडुरंग सोलगे, बबन पाटील यांचा समावेश होता.

 

संपादन - सचिन चराटी

 

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cloth Manufacturing Is Aggressive About The Paymentdara In Ichalkaranji Kolhapur Marathi News