सहकारी संस्था निवडणुकांना पुन्हा स्थगिती

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 January 2021

गोकुळ, केडीसीसी, ‘राजाराम’सह अन्य संस्थांचा समावेश

कोल्हापूर : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा ३१ मार्च २०२१ पर्यंत स्थगित करण्याचे आदेश आज सहकार विभागाने दिले. त्यामुळे गेले दोन दिवस ठरावांसाठी सुरू असलेल्या इच्छुकांच्या धडपडीला ब्रेक लागला आहे. सहकार खात्याच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील गोकुळ, जिल्हा बॅंक, राजाराम साखर कारखान्यासह शेकडो संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.

गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाचे संकट आले आणि राज्यातील सर्वच निवडणुकांना मुदतवाढ देण्यात आली. ज्या संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, त्यांचा निवडणूक कार्यक्रम आहे त्या टप्प्यावर थांबवण्याचे आदेश देण्यात आले. तीन महिने या संस्थांना मुदतवाढ दिली होती. तीन महिन्यांची मुदत संपल्याने पुन्हा या निवडणुकांना तीन महिने म्हणजेच ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे नूतन वर्षात केव्हाही निवडणूक जाहीर होण्याची शक्‍यता होती. त्यानुसार मंगळवारी (ता.१२) सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे आदेश काढण्यात आले; मात्र या शासन निर्णयाची शाई वाळते न वाळते तोपर्यंत लगेच आज पुन्हा या निवडणुका पुढे ढकलण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार आता ३१ मार्च २०२१ पर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

हेही वाचा- ऊर्जानिर्मितीचा कमी खर्चिक पर्याय उपलब्ध;मॉलिक्‍युलर हायड्रोजन निर्मितीची सुलभ प्रक्रिया -

जिल्ह्याची अर्थवाहिनी असणाऱ्या केडीसीसीसह गोकुळ दूध संघ, राजाराम कारखाना, यासह शेकडो संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मंगळवारी निवडणुकीचे आदेश आल्यानंतर इच्छुकांकडून मोर्चेबांधणी, गाठीभेटी सुरू होत्या; मात्र लगेचच या निवडणुकांना स्थगिती मिळाल्याने इच्छुकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. सध्या आहे त्या टप्प्यावर निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. जेव्हा या निवडणुका होतील, तेव्हा त्या थांबलेल्या टप्प्यावरूनच पुढे सुरू होणार आहेत.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Co operative society elections postponed in kolhapur