खरेदीला जाताय ? मग मास्क घालाच, अन्यथा रिकाम्या हातांनी परतावे लागेल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

कारखानदार, व्यापारी यांनीही मास्क नसेल तर प्रवेश नाही या संदेशाचा फलक दुकानाच्या दर्शनी लावावा.

कोल्हापूर : व्यापाऱ्यांनी मास्क घातला नसेल तर ग्राहकांनी वस्तू घेऊ नयेत आणि ग्राहकाने मास्क घातला नसेल तर व्यापाऱ्यांनीही वस्तू देऊ नयेत, असा उपक्रम राबविण्याचे आवाहन आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्यापारी-उद्योजकांना केले. वेगवेगळ्या व्यापारी असोसिएशनशी जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी व्यापाऱ्यांनीही याला प्रतिसाद दिला. या वेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे उपस्थित होते.

हेही वाचा - 101 चं याडचं भारी ; मानसिंगरावांची नित्य सवारी...! 

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, ‘‘कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम शासनाने सध्या हाती घेतली आहे. जिल्ह्यामध्येही वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कारखानदार, व्यापारी यांनीही मास्क नसेल तर प्रवेश नाही या संदेशाचा फलक दुकानाच्या दर्शनी लावावा. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. व्यापाऱ्यांनी मास्क लावला नसेल तर ग्राहकांनीही त्यांच्याकडून वस्तू घेणे टाळावे.

कर्मचाऱ्यांनीही दुकानात, प्रवेश करू नये. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांकडून सामाजिक अंतराचे पालन होत नसल्यास, व्यापाऱ्यांनीही त्यांना वितरण करू नये. फेरीवाले, किरकोळ विक्रेते, फळविक्रेते, दूध विक्रेते, मटण विक्रेते या सर्वांनीही या मोहिमेत सहभागी होऊन आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी  देसाई यांनी केले.

पालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने कोविड सेंटरला फळ, मास्क, हॅंन्डग्लोव्ह, सॅनिटाझर, घरगुती वापरासाठी ऑक्‍सिजन जनरेटरही द्यावे असे आवाहन केले. चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेट्टे, खजानीस हरीभाई पटेल, कार्यकारी संचालक ललित गांधी, अजित कोठारी, अतुल पाटील, गोविंद माने, रणजित शहा, संदीप वीर, कुलदीप गायकवाड, रघुनाथ कांबळे आदींनी यामध्ये सहभाग घेतला.

हेही वाचा - कोल्हापुरचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून शैलेश बलकवडे यांची नियुक्ती

 

उल्लंघन केल्यास कारवाई

व्यापारी, उद्योगपती, खासगी आस्थापनांकडून आवाहनाला प्रतिसाद दिला. खासगी व शासकीय कार्यालये, कारखान्यांमध्ये विनामास्क प्रवेश दिला जाणार नाही. सामाजिक अंतर राखणे आणि स्वच्छताविषयक स्टीकर आस्थापनांकडून मुद्रित केले जातील, ही स्टीकर्स आस्थापनांच्या बाहेरील ठिकाणी प्रदर्शित करू, असा प्रतिसाद असोसिएशनकडून मिळाला. नियमाचे उल्लंघन करणारे दुकान, कारखाने, कार्यालयांना दंडाची तसेच इतर कारवाईही केली जाणार आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: collector daulat desai connecting a video conference meeting with businessman in kolhapur to inform various precautions related to corona