महाविद्यालयांच्या अंतर्गत गुणांबाबत असा आहे संभ्रम

Confusion about internal marks in colleges
Confusion about internal marks in colleges

कोल्हापूर ः पदवीच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या अंतर्गत परीक्षांच्या गुणांवरून सरासरी गुण देण्यात येणार आहेत. मात्र, जिल्ह्यातील काही महाविद्यालयांत अंतर्गत परीक्षा झालेल्याच नाहीत; तर शारीरिक शिक्षण विषयाची परीक्षाही बहुतांश महाविद्यालयांत झालेली नाही. तसेच, अंतर्गत गुणांमध्ये कोणत्या गुणांचा समावेश करायचा, याबाबतही महाविद्यालयांत संभ्रम आहे. शासनाने अजून याबाबत कोणतेही स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. 
पदवीच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्या. त्यांना अंतर्गत परीक्षेतील गुण आणि गेल्या सत्र परीक्षेतील गुण यांच्या सरासरीएवढे गुण देण्याचा निर्णय झाला. यासाठी विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण 10 जुलैपर्यंत विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे देण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, बहुतांश महाविद्यालयांत लॉकडाउनमुळे प्राध्यापकांचा स्टाफ कमी आहे. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाची प्रक्रिया सुरू आहे. काही महाविद्यालयांत अंतर्गत परीक्षाच झालेली नाही. शारीरिक शिक्षण विषयाची परीक्षाही अद्याप झालेली नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत काय करायचे, याबाबत शासनाकडून कोणतेही स्पष्ट निर्देश आलेले नाहीत. परीक्षा विभागात अंतर्गत गुण आणि गेल्या सत्रातील गुण यांची सरासरी करून गुणपत्रिका तयार केली जाईल. मात्र, याबाबत अद्याप शासनाकडून निर्देश आलेले नाहीत. महाविद्यालयांना अंतर्गत गुण पाठवण्यासाठी मुदतवाढ विद्यापीठाकडून दिली जाणार आहे.

अंतर्गत गुण देण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाविद्यालयांत स्टाफ कमी असल्याने यासाठी वेळ लागतो आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून महाविद्यालयांना मुदतवाढ दिली जाईल. शासनाच्या सूचनांनुसारच पुढील कार्यवाही केली जाईल. 
- गजानन पळसे, परीक्षा नियंत्रक, शिवाजी विद्यापीठ. 

"एटीकेटी'च्या परीक्षेचा गोंधळ कायम 
ज्या विद्यार्थ्यांचे गेल्या सत्रातील विषय राहिले आहेत, त्यांना परीक्षा द्यावी लागेल. मात्र, या परीक्षा कधी आणि कशा पद्धतीने होणार, याबाबत अद्याप कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही. अंतिम वर्षाच्या परीक्षांचा गोंधळही अजून कायम असून, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम कायम आहे. 

-संपादन ः यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com