लसीकरणाचे काम, सहा महिने थांब!, आता तर जनावरांच्या टॅगिंग सक्तीचा घोळ, वाचा सविस्तर बातमी

The Confusion Of Animal Vaccination Continues Kolhapur Marathi News
The Confusion Of Animal Vaccination Continues Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : संभाव्य आजाराचा धोका टाळण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय मानला जातो. त्यामुळेच जनावरांना वर्षातून दोन वेळा लाळ खुरकतचे लसीकरण केले जाते. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सुरवातीला लसीकरणाला ब्रेक देण्यात आला. आता शासनाने "नो टॅग नो व्हॅक्‍सिन' अशी भूमिका घेतल्याने घोळ निर्माण झाला आहे. परिणामी, जनावरांचे लाळ खुरकतचे लसीकरण सहा महिन्यापासून थांबलेलेच आहे.

शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसायाकडे कल वाढल्याने गेल्या काही वर्षांत जनावरांची संख्या वाढली आहे. विविध साथीच्या आजारांना पशुधन बळी पडू नये याची काळजी घेतली जाते. प्रमुख साथीपैकी एक म्हणून लाळ खुरकतकडे पाहिले जाते. या आजाराची लागण झाल्यास दुधावर परिणाम होतोच पण, जनावर दगावण्याचीही शक्‍यता असते. शिवाय हा आजार संसर्गजन्य असल्याने एका जनावराकडून दुसऱ्या जनावरांकडे पसरतो. त्यामुळे खबरदारी म्हणून पशुसंवर्धन विभागामार्फत वर्षातून दोन वेळा लसीकरण राबविली जाते. 

गतवर्षी ऑक्‍टोबर महिन्यामध्ये लाळ खुरकतचे लसीकरण केले होते. त्यानुसार यंदा एप्रिल महिन्यात लसीकरण होणे अपेक्षित होते. त्यासाठी तालुकास्तरावर व्हॅक्‍सिनही आले. दरम्यान, मार्च महिन्यामध्येच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे लसीकरणाला ब्रेक दिला. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. पण, लॉकडाऊन निघालेले आहे. खबरदारी घेऊन अन्य सारे कामकाज पार पाडले जात आहे. त्यामुळे लसीकरणही सुरू होईल, अशी अपेक्षा होती. 

पण, केंद्र शासनाने "नो टॅग नो व्हॅक्‍सिन' अशी भूमिका घेतली आहे. टॅग नसणाऱ्या जनावरांना आधी टॅगिंग करावे आणि त्यानंतरच लसीकरण करावे, असे आदेश आहेत. मूळात पशुसंवर्धन विभागाकडे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या अपुरी आहे. त्यात टॅगिंग करायचे म्हटले तर जनावराला तीन-चार जणांनी धरणे आवश्‍यक आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही गोष्ट अडचणीची ठरणारी आहे. परिणामी, लाळ खुरकत लसीकरण रखडलेलेच आहे. 

दृष्टिक्षेपात आकडे.... 
- गडहिंग्लजचे पशुधन........76,335 
- टॅगिंग झालेले पशुधन.......38,287 
- टॅगिंग न झालेले पशुधन....38,048 

जनावरामागे पाच रुपये... 
खासगी दूध संघांकडील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रत्येक जनावराला टॅग मारणे व लसीकरणासाठी पाच रुपयांचा मोबदला निश्‍चित केला आहे. या तुटपुंजा मोबदल्यात काम करण्यात खासगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना उत्सुकता दाखविलेली नाही. टॅग व लसीकरणाचा मोबदला किमान दहा रुपये करावा, अशी मागणी केली जात असल्याचे समजते. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीमुळे शासनाची तिजोरी रिकामी आहे. त्यामुळे मोबदल्यात थेट दुप्पटीने वाढ मिळण्याची शक्‍यता कमीच आहे. 

...तर धोक्‍याची शक्‍यता 
कोरोनामुळे लॉकडाऊनचा निर्णय झाला. त्यामुळे जनावरांचे बाजार बंद केले. मात्र, आता लॉकडाऊनचे नियम टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत. जनावरांचे बाजार अद्याप बंद असले तरी नजीकच्या कालावधीत ते सुरू होण्याची शक्‍यता आहे. दरवर्षी लाळ खुरकतची साथ कर्नाटक सीमाभागातून येणाऱ्या जनावराकडूनच पसरते. त्यामुळे लसीकरण वेळेत झाले नाही तर साथीच्या धोक्‍याची शक्‍यता आहे.

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com