कोरोनामुळे म्हशींच्या खरेदी-विक्रीला ब्रेक; दूध उत्पादक चितेंत, "या' बाजार समितीलाही बसतोय फटका

दीपक कुपन्नावर
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

गेल्या दोन दशकात या परिसरात पाटबंधारे प्रकल्पांची संख्या वाढली आहे. साहजिकच हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढली. त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून दूध उत्पादनाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळले.

गडहिंग्लज : हिरव्या चाऱ्याच्या आधिक उपलब्धतेमुळे दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत म्हशीची खरेदी-विक्री जास्त होते. येथील प्रसिद्ध जनावरांचा बाजार गेल्या चार महिन्यांपासून बंद आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाने हा बाजार बंद ठेवला आहे. बाजार बंद असल्याने खरेदी-विक्री प्रक्रियेलाच ब्रेक लागल्याने दूध उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. परिणामी, गरजू शेतकऱ्यांना 30 टक्के चढ्या दराने खरेदी करण्याची वेळ आली आहे. बाजार समितीलाही या बाजारातून मिळणाऱ्या हमखास उत्पन्नावर पाणी सोडावे लागल्याने फटका बसला आहे. 

गेल्या दोन दशकात या परिसरात पाटबंधारे प्रकल्पांची संख्या वाढली आहे. साहजिकच हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढली. त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून दूध उत्पादनाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळले. दूध संस्थानीही याला आर्थिक पाठबळ दिल्याने दूध व्यवसाय जोमात आहे. अनेकांनी कामगार म्हणून भैय्ये ठेवून गोठा प्रकल्प सुरू केले आहेत. 

जून महिन्यापासून म्हशीच्या बाजारात उलाढाल वाढते. पावसाळ्यात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता अधिक असते. यामुळे शेतकरी या कालावधीतच जुनी जनावरे विकून नव्याने खरेदी करतात. नव्याने दूध व्यवसायात उतरणारेही या कालावधीतच म्हशी घेऊन श्री गणेशा करतात. येथील बाजार समितीत दर रविवारी 150 ते 200 म्हशींची आवक होते. जाफरा, मुऱ्हा, पंढरपुरी यासह स्थानिक जातीच्या म्हशी बाजारात येतात.

चाळीस ते दीड लाख रुपयापर्यंत म्हशीचे दर आहेत. मार्च मध्यापासून कोरोनासाठी जनावरांचे बाजार बंद आहेत. खरीप हंगामासाठी लागणाऱ्या बैलजोड्याही खरेदीसाठी शेतकऱ्यांना अडचणी आल्या. आताही बाजार बंद असल्याने चांगल्या म्हशी कशा खरेदी करायच्या, हा प्रश्‍न आहे. व्हॉटसअपद्वारे तुरळक व्यवहार सुरू आहेत. 

म्हैस बाजार दृष्टिक्षेपात 
- आठवड्याला म्हशीची आवक - 150 ते 200 
- म्हशीचे दर- 40 हजार ते 1 लाख 50 हजार रुपये 
- उलाढाल - 3 ते 4 लाख रुपये 
- बाजार समितीला उत्पन्न- 8 ते 10 हजार रुपये 

व्हॉटसअपद्वारे खरेदी करण्यात धोका
ऐन हंगामातच जनावरांचा बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. पर्याय नसल्याने दूध उत्पादकांना 20 ते 30 टक्के आधिक दराने म्हशी खरेदी कराव्या लागत आहेत. मोठी गुंतवणूक असल्याने व्हॉटसअपद्वारे खरेदी करण्यात धोका आहे. 
- संजय जरळी, दूध उत्पादक, गडहिंग्लज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Breaks Buffalo Trade Kolhapur Marathi News