संकटातूनही शोधल्या संधी ; विविध क्षेत्रांत सकारात्मक बदलांची नांदी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 31 August 2020

कोरोना इफेक्‍ट;  नवे प्रयोग यशस्वी

 कोल्हापूर : कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. कोरोनामुळे घडलेल्या वाईट गोष्टींची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली; मात्र याच संकटातून विविध क्षेत्रांत अनेक संधी निर्माण झाल्या. सकारात्मक बदलांची नांदी झाली आणि त्यातून नव्या संकल्पना पुढे आल्या. त्या यशस्वीही झाल्या. आरोग्यापासून रोजगारापर्यंत आणि विवाह समारंभापासून पंचगंगेचे प्रदूषण कमी होण्यापर्यंत अनेक सकारात्मक स्थित्यंतरे अनुभवायला मिळू लागली आहेत. त्याचा हा वेध...
 

सकस आहार, व्यायामाकडे कल
मार्चमध्ये कोरोनाचा जिल्ह्यात शिरकाव झाला. एकापेक्षा अधिक आजार असणाऱ्या व्यक्‍तीला कोरोनाचा त्रास होतो; तर ज्याची तब्येत चांगली आहे, प्रतिकारशक्‍ती चांगली आहे, त्यांना कोरोनाचा त्रास होत नाही, असे आरोग्य यंत्रणेसह सोशल मीडियातून वारंवार सांगण्यात येऊ लागले. परिणामी, लोकांनी आहार, व्यायाम आणि तणावमुक्‍त राहण्याचा प्रयत्न केला. पाच ते सहा महिने कोरोनामुळे आरोग्याबाबत मात्र चांगलीच जागृती झाल्याचे चित्र आहे. सकाळी काढा, नंतर व्यायाम, प्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी मांसाहाराबरोबरच मोड आलेले कडधान्य, सेंद्रिय भाजीपाला, सुकामेवा याकडे लोकांचा कल वाढला आहे. शक्‍यतो बाहेरील खाण्याचे प्रमाण कमी झाले. तणावमुक्‍तीसाठी प्राणायाम, योगासने यांची जोड दिली जाते. जेवणात प्रोटिन्सयुक्‍त पदार्थांचा वापर वाढला आहे. 
 

‘स्टार्टअप्‌’सह विविध पर्याय पुढे
नोकरीची शाश्‍वती आणि अनिश्‍चितता सुरू झाल्याने स्वयंरोजगार आणि पर्यायी आर्थिक उत्पन्नाचा स्रोत आता पुढे येऊ लागला आहे. केवळ नोकरीवर अवलंबून न राहता इतर छोटे-मोठे व्यवसाय सुरू करण्याकडे, त्यांचा अभ्यास करण्याकडे कामगारांचा कल वाढला आहे. कोणतीही भीती अथवा संकोच न बाळगता कुटुंबीयांच्या मदतीने नवीन स्टार्टअप सुरू करण्याचा अनेकांचा प्रयत्न सुरू झाला आहे. स्वतःचा आर्थिक स्रोत आपल्या कुवतीनुसार नव्याने तयार करण्याची ऊर्जा कोरोना काळात कामगार वर्गाला मिळाली. ज्यांच्याकडे मल्टिस्कील नाही, त्यांनाही टिकण्यासाठी व त्याचे ज्ञान घेण्यासाठी कोरोना काळाने प्रवृत्त केले. कोरोनामुळे वयाचा विसर पाडून अनेक जण नव्या स्कीलचे शिक्षण घेत आहेत.

हेही वाचा- ‘तो’ प्रस्तावच रुग्णांना तारणार ; दहा दिवसांत होणार नियोजन

जलस्रोतांचे प्रदूषण घटले 
लॉकडाउनच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात पंचगंगा नदी प्रदूषणाची पातळी कमी झाली. शहरात रोज ९६ एमएलडी सांडपाणी तयार होते. मात्र, लॉकडाउनमध्‍ये हॉटेल, रेस्टॉरंट, मंगल कार्यालये बंद होती. या कालावधीत रोज ९० एमएलडी सांडपाणी निर्मिती झाली. म्हणजेच सहा एमएलडी सांडपाणी कमी तयार झाले. महापालिकेच्या कसबा बावडा आणि दुधाळी या दोन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांत ९१ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते. सर्व सांडपाणी प्रक्रिया होऊनच नदीत सोडले जाले. औद्योगिक सांडपाणीही थांबले. नदीकाठी कपडे धुणे, जनावरे धुणे लॉकडाउनमध्ये झाले नाही. महापालिका, शिवाजी विद्यापीठ पर्यावरण विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ या यंत्रणांनी नदीच्या पाण्याची चाचणी घेतली. यात नदीच्या प्रदूषण पातळीत घट झाल्याचे दिसले.

अपघातासह गुन्हेगारीला ब्रेक 
लॉकडाउन काळात रस्त्यांवरील अपघातासह गुन्हेगारीला आळा बसला. फक्त अत्यावश्‍यक सेवेतील वाहने सोडली तर रस्त्यांवर शुकशुकाट होता. परिणामी अपघातांच्या संख्येत घट झाली. शहरातील गल्ल्याही बॅरिकेडस्‌ लावून सील केल्या होत्या. मार्च ते जून या चार महिन्यांच्या काळात अनुक्रमे पाच, एक, सहा, सहा असे खुनाचे गुन्हे उघडकीस आले तर दहा, तीन, पंधरा, आठ यानुसार प्राणघातक हल्ल्याचे प्रमाण राहिले. जबरी चोरी अनुक्रमे १३, ४, ५, ४ तर घरफोडीचे अनुक्रमे १७, २३, १३, १७ असे आणि चोरीचे गुन्हे अनुक्रमे ५६, १९, ३८, ६६ इतक्‍या प्रमाणात उघडकीस आले. मारामारीचे २५, १८, ५१, ५२ तर महिला अत्याचाराचे ९, १, ९, ९ आणि अपघाताचे २२, ६, १३, २२ असे गुन्हे घडले. 

बिग बजेट प्रकल्प आले...
कोल्हापूर ही चित्रपंढरी. पण, मध्यंतरीच्या काळात येथील शूटिंगचे प्रमाण कमी झाले. मात्र, कोरोनाच्या संकटातून संधी शोधत येथील कलाकार व तंत्रज्ञांनी पुढाकार घेऊन कोल्हापुरात विविध प्रकारची शूटिंग वाढावीत, यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याला पालकमंत्र्यांसह चित्रनगरी प्रशासनानेही खमके पाठबळ दिले आणि आता बिग बजेट प्रकल्प कोल्हापुरात यायला प्रारंभ झाला आहे. ‘दख्खनचा राजा जोतिबा’ या मालिकेच्या सेटच्या कामाला चित्रनगरीत प्रारंभ झाला. या मालिकेचे तब्बल चार वर्षे येथे शूटिंग सुरू राहणार आहे. आणखी किमान सहा मराठी व हिंदी मालिकांचे शूटिंगही लवकरच सुरू होणार असून, वेबसीरिज, ‘ओटीटी’ (ओव्हर दि टॉप) प्रकल्पासाठीही लोकेशन्सला मागणी वाढली.

 
शिवारात पिके जोमदार
कोरोनामुळे गावातून नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी बाहेर गेलेले लोक गावी परतले. गावातही कडकडीट बंद असल्याने दिवसभर घरात बसणेही शक्‍य नव्हते. त्यामुळे गावात बाहेरून आलेली ही मंडळी शेतात रमली. शेतातील कामे वेळेवर केली. परिणामी, यंदा पिकेही जोमदार आली आहेत. लॉकडाउनमुळे शेतीला यंदा वेळेत मनुष्यबळ मिळाले. मुळात बेरोजगारांना फारशी संधी मिळाली नाही. घरातल्या लोकांनीच शेतीची चांगली निगा राखली आहे. घरच्या मनुष्यबळामुळे शेतीकामाच्या मशागतीवर होणारा खर्च वाचला. वेळेत पेरणी होऊन शेती तणमुक्‍त झाली.

      
शॉपिंगचा खर्च कमीच
कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये शॉपिंग मॉल बंद राहिल्याने लोकांच्या अनाठायी खर्चाला आळा बसला आहे. शहरातील विविध मॉलमध्ये कपडे, सेंट व इतर शॉपिंग करता येत नव्हते. महिनाभर मॉल बंद राहिल्याने खर्चात कपात झाली. कोणत्याही मॉल किंवा शॉपिंग सेंटरमध्ये एकदा खरेदीसाठी गेले, की किमान हजार- दोन हजार रुपयांची खरेदी किंवा कपडे खरेदी केले तर किमान २ ते ३ हजार रुपयांची खरेदी होत होती. लॉकडाउनपासून या खर्चाला आळा बसला. मॉलमधील सर्व खरेदी ठप्प झाली. इतर दुकानेही बंद राहिल्याने आहे त्यामध्येच समाधान मानून लोकांनी या दिवसांत गुजराण केली. कोरोनाच्या लॉकडाउनमुळे लोकांना आहे त्यात भागवण्याची किंवा गरज नसताना खरेदीची गरज काय, असा धडाही मिळाला आहे.

दादा गुरवार हाय खोटं बोलत नाही,  मावशी तुम्ही बरोबर आहात, अजिबात माघार घेऊ नका

हेही वाचा-दीड हजार आणि तीनशे’ व्हायरल

 

लग्नाचा खर्च खूपच कमी
ना बॅंड ना बाजा. १० ते १५ लोकांची उपस्थिती. साखरपुडा आणि लग्न एकाच दिवशी झाले. ६ ते ७ लाख रुपये खर्च येईल असे वाटत असताना ५० ते ६० हजारांत मुलीचं लग्न केल्याचा आनंद सामान्यांच्या वाट्याला आला आहे. कोरोनामुळे ठराविक लोकांच्या उपस्थितीतच लग्न करण्याची अट असल्यामुळे लग्नासाठी होणाऱ्या अनाठायी खर्चाला आळा बसला. पाचशे लोकांच्या उपस्थितीतल्या एका लग्नासाठी सुमारे ६ ते ७ लाखांचा खर्च अपेक्षित असतो. जेवणासाठी किमान दोन लाखांहून अधिक खर्च होतो. ४० हजार ते ५० हजार रुपये मंगल कार्यालयासाठी तर दागिन्यांसाठी ३ लाख रुपये खर्च होतात. कपडे व इतर मानपानासाठी २ लाख रुपये खर्च होतात. इतर ५० हजार रुपये खर्च होतोच. त्यामुळे कोणाला कर्जबाजारी होऊन मुला-मुलींचे लग्न करावे लागले नाही.

अन्नाची नासाडी थांबली
कुटुंबातील एखाद्या सदस्याचे निधन झाल्यावर रक्षाविसर्जनाच्या दिवशी अंत्यसंस्काराच्या जागेवर पै-पाहुण्यांच्या नैवेद्यांचा खच पाहायला मिळायचा. भुकेलेले फिरस्ते, भिकारी यांच्या पोटात त्यातील काही घास जायचे. पोटाची भूक शमली जायची. कुत्री, मांजरंसुद्धा नेवैद्यांवर ताव मारायची. मात्र, उर्वरित नैवेद्य स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना कोंडाळात टाकण्यावाचून पर्याय नव्हता. त्यातून अन्नाची नासाडी व्हायची. हे चित्र बदलले आहे. अंत्यसंस्कारासाठी पाच व्यक्ती व रक्षाविसर्जनासाठी एकच नैवेद्य ठेवण्यासाठी आवाहन केले. त्याला नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्षाविसर्जनाला केवळ घरचा नैवेद्य येऊ लागला. विशेष म्हणजे विविध समाजघटकांनी यापुढे एकच नैवेद्य ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona effect Herald positive changes in various fields new experiments succeed