...अखेर पन्‍हाळा गडही कोरोनाच्‍या विळख्‍यात  

आनंद गजताप 
गुरुवार, 30 जुलै 2020

22  मार्चपासून  25 जुलैपर्यंत पन्‍हाळ्यातील नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाच्‍या सहाय्याने पन्‍हाळगड कोरानामुक्‍त ठेवला होता.

पन्‍हाळा - तब्‍बल चार महिने कोरोनापासून अलिप्‍त राहिलेला पन्‍हाळगडही कोरेानाच्‍या विळख्‍यात सापडल्‍याने पन्‍हाळवासियांचे धाबे दणाणले आहेत. 27 जुलै रोजी येथील 83 वर्षीय व्रुध्‍दा आणि तिचा केअरटेकर असे दोघजण कोरोना बाधित आढळले. त्‍याचवेळी त्‍यांच्‍या संपर्कातील 12 जणांचा स्‍वॅब तपासणीसाठी घेण्‍यात आला. त्‍यापैकी आज चारजणांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आल्‍याने प्रशासनाची धांदल उडाली तर पन्‍हाळकरांच्‍या तोंडचे पाणी  पळाले  आहे.

22  मार्चपासून  25 जुलैपर्यंत पन्‍हाळ्यातील नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाच्‍या सहाय्याने पन्‍हाळगड कोरानामुक्‍त ठेवला होता. कोरोनाचे आक्रमण पन्‍हाळगडी होवू नये म्‍हणून गडावर येणारा मुख्‍य चार दरवाजातील रस्‍ता आणि तीन दरवाजातील रस्‍ता बंद केला होता. आठवडी बाजार बंद करण्‍यात आला होता, तर गडावर कार्यालयीन कामासाठी येणा-या  पक्षकारांना ओळखपत्र पाहूनच प्रवेश दिला जात होता. नाक्‍यावर चोवीस तास  कर्मचारी तैनात करण्‍यात आले होते. कोल्‍हापूर जिल्ह्यात लॉकडाउन थोडासा  शिथिल होताच येथील प्रवासीकर नाक्‍यावर पर्यटकांची गर्दी होवू लागल्‍याने तहसीलदार रमेश शेंडगे यांच्‍यासह मुख्‍याधिकारी डॉ. कैलास चव्‍हाण नाक्‍यावर येवून थांबू लागले आणि पोलिसांच्‍या सहाययाने नाक्‍यावरील गर्दी कमी करत होते.  हेतू एवढाच की थंड हवेच्‍या पन्‍हाळगडी या विषाणुंचा प्रसार होवू नये आणि पन्‍हाळ वासियांचे आरोग्‍य चांगले राहावे. खबरदारीचा उपाय म्‍हणून स्‍वच्‍छता, औषधफवारणी, मास्‍क आदि उपाययोजना प्रभावीपणे राबवूनही गडावर अखेर कोरोनाचे आक्रमण झालेच. 

हे पण वाचा - कोल्हापुरात आता कोरोनाच्या या रुग्णांवर होणार घरीच उपचार

 
साहजिकच आता रुग्‍ण सापडलेल्‍या गल्‍या, बोळ बंद करण्‍याची वेळ आली असून रुग्‍णांच्‍या संपर्कातील व्‍यक्‍तींना कोरोंटाईन करावे लागले आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona entry on panhala fort