कोरोनामुळे गावच्या शाळांकडे वाढला कल

Corona Increased The Tendency Towards Village Schools Kolhapur Marathi News
Corona Increased The Tendency Towards Village Schools Kolhapur Marathi News

गडहिंग्लज : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शहरातील शाळांकडे कल, हे तसे नेहमीचेच चित्र. पण, यंदा यामध्ये थोडा बदल झाला आहे. शिक्षणासाठी शहराची वाट धरलेल्या ग्रामीण विद्यार्थ्यांना आता आपल्या गावचीच शाळा बरी वाटू लागली आहे. यामागे कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावाचे कारण आहे. पालकांनी आपल्या पाल्यांच्या आरोग्याला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. 

गेल्या काही वर्षांत खासगी शाळांची संख्या वाढली. शहरात नव्याने सुरू झालेल्या शाळांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी-पालकांना आकर्षित केले. त्यामुळे शहरातील अन्य खासगी मराठी माध्यमाच्या शाळामध्येही बदल झाला. विद्यार्थ्यांना गणवेशासह अन्य सुविधा पुरविल्या जाऊ लागल्या. परिणामी, ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची संख्या वाढली. अर्थातच त्याचा परिणाम ग्रामीण भागातील शाळांवर झाला. विशेषत: शहरालगत असणाऱ्या गावातील शाळांची पटसंख्या मोठ्या प्रमाणात रोडावल्याचे दिसून येत आहे. 

मात्र, यंदा वेगळीच परिस्थिती दिसून येत आहे. शहरातील शाळांत शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या गावातीलच शाळेत प्रवेश घेतले आहेत. ग्रामीण भागातून शहरात येणारे विद्यार्थी यंदा शहरातील शाळांतून ग्रामीण भागातील शाळेत जात आहेत, हे तसे दरवर्षीपेक्षा उलटे चित्र तयार झाले आहे. कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सप्टेंबर संपत आला तरी अद्याप शाळांना सुरवात झालेली नाही. कधी सुरू होणार याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. पण, पालकांनी आपल्या पाल्यांच्या आरोग्याला प्राधान्य दिल्याचेच यातून स्पष्ट होत आहे. 

शहरातील शाळांत विद्यार्थी संख्या अधिक असते. शिवाय गावातून शहरात शिक्षणासाठी जायचे म्हटले, तर एसटी बस किंवा खासगी वाहतूक व्यवस्थेचा आधार घ्यावा लागेल. यातून कोरोना संसर्गाचा धोका अधिक संभवतो. शिवाय भविष्यातील परिस्थिती कशी असेल हे सांगता येत नाही. हीच बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी गावातील शाळेतच प्रवेश घेण्याला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट होत आहे. शहरातील एका शाळेतून सुमारे वीस विद्यार्थ्यांच्या दाखल्यांची मागणी झाली आहे. यावरून परिस्थिती लक्षात येत आहे. 

शाळांकडे दाखल्यांची मागणी... 
दरवर्षी 30 सप्टेंबरला संच मान्यता होते. 30 सप्टेंबरपर्यंत झालेल्या प्रवेशावर पटनिश्‍चिती केली जाते. पटसंख्येच्या प्रश्‍नामुळे शिक्षकांचे भवितव्यही त्यावरच अवलंबून असते. गतवर्षी शहरातील शाळेत शिकणारे पण, यंदा आपल्या गावातील शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या दाखल्यांची मागणी संबंधित शाळांकडून केली जात आहे. मागणीनुसार शहरातील शाळांतून दाखले देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com