ब्रेकिंग - अटक केलेला संशयित निघाला पॉझिटिव्ह अन् अख्खे गुन्हे शोध पथकच झाले क्वारंटाईन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

महिन्याभरापूर्वी लक्ष्मीपुरीत घराची तोडफोड तसेच प्राणघातक हल्ला झाला होता.

कोल्हापूर - प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संशयिताला लक्ष्मीपुरी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली. दरम्यान वैद्यकीय तपासणीत त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला तशी लक्ष्मीपुरीतील पोलीस यंत्रणेची तारांबळ उडाली. येथील गुन्हे शोध पथकातील सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांना आज क्वारंटाईन करण्यात आले. 

महिन्याभरापूर्वी लक्ष्मीपुरीत घराची तोडफोड तसेच प्राणघातक हल्ला झाला होता. यातील दोन संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागले नव्हते. 31 जुलैला त्या दोघांना लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने अटक केली. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात या गुन्ह्यातील प्रमुख संशयिताची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. त्याला राजारामपुरी येथील स्वतंत्र कोठडीत ठेवण्यात आले होते. पोलिसांनी त्याच्या कोठडीचा हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. तशी त्याची तात्पुरत्या कारागृहात रवानगी करण्यात आली होती. दरम्यान, त्या संशयिताचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला तशी पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. लक्ष्मीपुरीतील संपूर्ण गुन्हे शोध पथकाला क्वारंटाईन करण्यात आले. 

आज तब्बल ४५५ नव्या रूग्णांची भर 

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 1687 प्राप्त अहवालापैकी 1160 निगेटिव्ह तर 455 अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. शिवाय जिल्ह्यात आजअखेर एकूण 6905 पॉझीटिव्हपैकी 3067 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 3639 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 462 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-9, भुदरगड- 14, चंदगड-2, गडहिंग्लज-4, हातकणंगले-70, कागल-30, करवीर-82, पन्हाळा-29, राधानगरी-22, शिरोळ-16, नगरपालिका क्षेत्र- 53, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 125, इतर जिल्हा व राज्यातील-6 असा समावेश आहे. 

हे पण वाचा महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने कोल्हापूरकरांना झोडपले पण... 

 

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या 

आजरा- 152, भुदरगड- 152, चंदगड- 382, गडहिंग्लज- 249, गगनबावडा- 13, हातकणंगले- 594, कागल- 141, करवीर- 788, पन्हाळा- 293, राधानगरी- 235, शाहूवाडी- 269, शिरोळ- 257, नगरपरिषद क्षेत्र- 1410, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-1869 असे एकूण 6804 आणि इतर जिल्हा व राज्यातील - 101 असे मिळून एकूण 6905 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

  

जिल्ह्यातील एकूण 6905 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 3067 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 199 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 3639 इतकी आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona infection to arrest suspect in kolhapur