गांधीनगर परिसरामध्ये कोरोनाचा शिरकाव ; वळिवडेतील 'तो' तरुण कोरोना बाधित...

Corona positive patient found in valivade kolhapur
Corona positive patient found in valivade kolhapur

गांधीनगर - वळिवडे (ता. करवीर) येथील एक हॉटेल व्यावसायिक तरुण आणि गांधीनगर येथील एका महिलेचा कोरोना अहवाल काल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला आणि गावामध्ये एकच खळबळ माजली. गांधीनगर परिसरामध्ये कोरोनाने आज अखेर शिरकाव केला नव्हता परंतु काल रात्री आलेल्या या अहवालांनी परिसरातील गांभिर्य वाढवले. वळिवडे आणि गांधीनगरातील काही भाग सील केला असून. वळिवडे गाव तीन दिवसांसाठी पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

झोपडपट्टी करण्यात आली सील

वळिवडेतील या तरुणाचे हॉटेल असून शिवभोजन थाळी केंद्रही तो चालवितो. गेल्या आठवड्याभरात त्याला त्रास होऊ लागल्याने सुरुवातीला एका खासगी रुग्णालयात त्याने उपचार घेतल्याचे समजते. तरीही प्रकृती चांगली झाली नसल्याने त्याला कोल्हापुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठविला होता. रात्री उशिरा त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. गांधीनगरातील इंदिरानगर झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या महिलेचा अहवालही रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला. गांधीनगर येथील सरपंच रितू लालवानी आणि कर्मचारी यांनी कोरोना पॉझिटिव्ह असणारी महिला रहात असलेला इंदिरानगर झोपडपट्टी परिसर रात्रीमध्ये सील केला.

तो गेला होता गृहमंत्र्यांना निवेदन द्यायला

दोन आठवड्यापूर्वी शासकीय विश्रामगृहावर गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांना निवेदन देण्यासाठी तो हॉटेल व्यावसायिक तरुण गेला होता. त्यावेळी शिष्टमंडळासमवेत त्याने गृहमंत्र्यांना निवेदन दिले होते.

आज सकाळी वळिवडे येथे सरपंच अनिल पंढरे, पोलीस पाटील दिपक पासाण्णा, ग्रामसेवक बी. डी. पाटील, तलाठी प्रविण शेजवळ, ग्रामपंचायत सदस्य भगवान पळसे, प्रकाश शिंदे, संजय चौगुले, कर्मचारी सुनिल देवणे, बाजीराव पोवार, वैभव पाटील या सर्वांनी मिळून गावातील प्रमुख रस्ते बंद केले. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने संपूर्ण गाव तीन दिवस पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात येत असल्याचे गावातून लाऊडस्पिकरवरुन घोषित करण्यात आले. कोरोना पॉझिटिव्ह तरुण रहात असलेला परिसर सील करण्यात आला असून त्याच्या कुटुंबातील आणि संपर्कात आलेल्या 10 जणांना तपासणीसाठी पाठविण्यात आले असून या तरुणाच्या संपर्कात आणखीन कोणी आले होते का याचा शोध घेण्यात येत आहे.

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com