तो होता एका गावचा अन् पत्ता सांगितला दुसऱ्या गावचा ; गावकऱ्यांच्या उरात भरली धडकी

corona positive patient told wrong address
corona positive patient told wrong address

कोडोली (कोल्हापूर) : जिल्हा प्रशासनाने आज जाहीर केलेल्या तालुकानिहाय कोरोना यादीत कोडोलीत रुग्ण असल्याचे जाहीर करताच गावात खळबळ उडाली; परंतु तळसंदे (ता. हातकणंगले) येथील बाधित रुग्णाने पत्ता लपविण्यासाठी हे कृत्य केल्याचे समजताच येथील नागरिकांचा जीव भांड्यात पडला.


याबाबतची माहिती अशी, तळसंदे येथील रहिवासी वारणा सहकारी साखर कारखान्यात चालक म्हणून काम करीत होता. तो खासगी कामासाठी नांदेड येथे गेला होता. त्याने परत येताना तपासणी नाक्‍यावर पत्ता कोडोली गावचा सांगितल्याने कोडोलीची नोंद झाली. या नाक्‍यावरून त्याला पन्हाळा येथील एकलव्य कोरोना केअर सेंटरवर पाठविले. तेथे त्याचा स्वॅब घेऊन क्वारंटाईन केले होते. आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ग्रामपंचायतीला माहिती देऊन त्याच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्यास सांगण्यात आले. यानंतर कोरोना दक्षता समितीची चांगलीच धावपळ उडाली. अशा नावाची व्यक्ती कोडोलीत नसल्याने त्यांच्यापुढे प्रश्न उभा राहिला. 

दरम्यान, ही माहिती सोशल मीडियावर पसरताच गावात शुकशुकाट पसरला. ग्रामपंचायतीने अशी व्यक्ती कोडोलीत नसल्याची माहिती एकलव्य कोरोना केअर सेंटरला कळवली. यानंतर बाधिताकडे सखोल चौकशी केली असता त्याने खरा पत्ता तळसंदे असल्याचे सांगितले. बाधित तळसंदे येथील असल्याचे सिद्ध झाल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला.

 तळसंदे भीतीच्या छायेत

 तळसंदे (ता. हातकणंगले) येथील चालकास कोरोनाची बाधा झाल्याने गावात भीतीचे वातावरण आहे. पन्नास वर्षे वयाची व्यक्ती चालक असून त्याला प्रवासात बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता गाव लॉकडाउन केले आहे. बाधिताच्या संपर्कात आलेल्याची चौकशी सुरू आहे.
 संबंधित व्यक्ती तळसंदे (ता. हातकलंगले) गावचा असून, तो वारणा कारखान्याचा कर्मचारी आहे. लॉकडाउन सुरू झाल्यापासून कामावरही आलेला नाही. त्यामुळे कोडोलीला या व्यक्तीपासून धोका नाही व कोणीही घाबरू नये.
- शंकर पाटील, सरपंच 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com