दुर्दैव : कोरोना योद्धा शिक्षकाची चटका लावणारी एक्झिट ; नगरसेवकासह तरूणांनी केला अंत्यविधी 

corona worker teacher pass away in kolhapur gadhinglaj
corona worker teacher pass away in kolhapur gadhinglaj

गडहिंग्लज (कोल्हापूर) : कोविडच्या कालावधीत घर टू घर तपासणीसह विविध कामात योद्धयाप्रमाणे राबणाऱ्या येथील एका नगरपालिका शाळेतील शिक्षकाचे निधन झाले. त्यांना श्‍वासोच्छवासाचा त्रास सुरू झाल्याने कोल्हापुरातील खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. त्यांचा कोरोना अहवालही निगेटीव्ह आला होता. दरम्यान त्यांचे काल निधन झाले. भोला दस्तगीर पानारी (वय 47) असे या शिक्षकाचे नाव. कोरोनाच्या सावटात त्यांच्यावर अंत्यविधीचा प्रश्‍न तयार झाला असतानाच अखेर एका नगरसेवकासह काही तरूणांनी पीपीई किट वापरून आज पहाटे चारच्या सुमारास कडगाव रोडवरील मुस्लिम दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यविधी केला.

पानारी हे पालिका शिक्षण मंडळाच्या दिनकरराव शिंदे विद्यालयात सेवेत होते. त्यांचे मूळ गाव तालुक्‍यातील हलकर्णी होय. शहरातील मेटाचा मार्ग परिसरात त्यांचे कुटूंब राहते. कोविड काळात शाळा बंद असल्याने शिक्षकांना कोरोना संदर्भातील विविध कामांमध्ये गुंतवले आहे. त्यात श्री. पानारींचा समावेश होता. त्यांना श्‍वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागल्याने कोल्हापुरातील दवाखान्यात दाखल केले होते. तत्पूर्वी येथील उपजिल्हा रूग्णालयातील त्यांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटीव्ह आला होता. 

दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी त्यांचे निधन झाले. मृतदेह रात्री एक वाजता येणार होता. कोरोनाच्या भितीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणार कोण, हा प्रश्‍न आल्यानंतर नगरसेवक महेश कोरी यांनी आपले सहकारी कार्यकर्ते इम्रान चॉंद, दस्तगीर पटेल, शाहरूख जिनाबडे, सलीम नदाफ, ताहीर कोचरगी, जमीर मुल्ला, साहिल सौदागर, कैयूम नदाफ, जाफर तपकीरे, वासिम मुल्ला, इलियास सय्यद, इर्शाद शेख, इजहार मुल्ला, मुबारक नदाफ यांच्यासह पप्पू सलवादे दफनभूमीकडे रवाना झाले. मृतदेह दफनासाठी खड्डा काढला. रात्री एकपर्यंत येणारा त्यांचा मृतदेह पूर स्थितीमुळे कोल्हापूरहून गडहिंग्लजला पोहचण्यास तब्बल सात तास लागले. पहाटे चारच्या सुमारास मृतदेहावर अंत्यविधी झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली, आई, भाऊ असा परिवार आहे. 

  स्वत: ओढली माती 
पानारी यांच्या मृतदेहासोबत केवळ त्यांचे भाऊ होते. इतर कोणीही नसल्याने मृतदेह शववाहिकेतून उतरवण्यापासून दफन करेपर्यंत नगरसेवक  कोरी व त्यांचे सहकारी सक्रीय होते. मृतदेहावर विधी झाल्यानंतर दफन करताना स्वत: श्री. कोरी व इम्रान मुल्ला, इर्शाद व सलील नदाफ या चौघांनी माती ओढण्याचे काम केले. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या एका शिक्षकावर अंत्यविधी करण्यात तरूणांनी घेतलेल्या पुढाकाराने गडहिंग्लजची विधायक दिशा स्पष्ट होते.
 


संपादन- धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com