अक्षय्यतृतीयेच्या खरेदीवर कोरोनाचे सावट 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेवर यंदा कोरोनाचे सावट आहे. या मुहूर्तावर सोने-चांदी, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, दुचाकी-चारचाकी वाहनांचे बुकिंग, फ्लॅट - घरांचे बुकिंग केले जाते. यंदा मात्र टाळेबंदीमुळे या सर्वांनाच ब्रेक लागला आहे.

कोल्हापूर :  साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेवर यंदा कोरोनाचे सावट आहे. या मुहूर्तावर सोने-चांदी, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, दुचाकी-चारचाकी वाहनांचे बुकिंग, फ्लॅट - घरांचे बुकिंग केले जाते. यंदा मात्र टाळेबंदीमुळे या सर्वांनाच ब्रेक लागला आहे. त्यामुळे या क्षेत्रात अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या कोट्यवधींच्या उलाढाली ठप्प झाल्या आहेत. यावर आधारित असलेल्या व्यवसायांनाही याचा फटका बसला आहे. मात्र, यंदा या खरेदीवर कोरोनाचे सावट ओढावले आहे. एरवी या दिवशी गजबजणारा गुजरी, महाव्दार रोड, शिवाजी रोड, बिंदू चौक या सर्व परिसरात नीरव शांतता पसरली आहे. 

अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी केल्यास ते वृद्धिंगत होत जाते, अशी धारणा आहे. त्यामुळे या दिवशी प्रामुख्याने एक ग्रॅमपासून ते तोळ्यापर्यंतची सोने खरेदी करण्यावर भर दिला जातो. या खरेदीतून मोठी उलाढाल होते. त्यामुळे या खरेदीला फटका बसला आहे. या मुहूर्तावर मोबाईल, एलईडी टी.व्ही., फ्रीज या वस्तूंची खरेदीही मोठ्या प्रमाणात केली जाते. सध्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स दुकानेही बंद असल्याने इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंची खरेदी-विक्रीही होणार नाही. 

ऑनलाईन खरेदीकडे कल 
ग्राहकांना सोने, चांदी खरेदी करता यावी, यासाठी दागिन्यांच्या मोठ्या शोरूम्सनी ऑनलाईन खरेदीची सुविधा सुरू केली आहे. वेबसाईटवरील डिझाईन्स पाहून ग्राहकांना नोंदणी करता येते. या दागिन्यांची डिलिव्हरी मात्र लॉकडाऊननंतर होणार आहे. अशा खरेदीकडे शहरातील ग्राहकांनी पसंती दिली आहे, असे "तनिष्क'चे प्रसाद कामत यांनी सांगितले. मात्र, गाड्यांचे बुकिंग ऑनलाईन करता येत असले तरी ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. 

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते. मात्र, लॉकडाऊनमुळे सध्या सोने- चांदी ग्राहकांना खरेदी करता येणार नाही. आम्ही सराफ व्यावसायिक शासनाच्या नियमांचे पालन करणार आहोत. 
- भरत ओसवाल, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा सराफ संघ 

लॉकडाऊन काळात गाड्यांचे मार्केट थंडावलेले आहे. दुचाकींची नोंदणी करता येते. मात्र, त्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. 
- राजेंद्र गुरव, जनरल मॅनेजर, मोहिते सुझुकी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronation on the purchase of Akshayya Tritiya