शिक्षकांचे कोविड चाचणीचे रिपोर्ट प्राप्त नसताना शाळा सुरू करण्याची एवढी घाई का?

संजय पाटील
Saturday, 28 November 2020

शिक्षकांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट आल्याशिवाय शिक्षण संस्थानी शाळा सुरु करणे घातक ठरण्याची शक्यता आहे.

घुणकी (कोल्हापूर)  : शिक्षकांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट येण्यापूर्वीच जिल्ह्यातील बऱ्याच शाळा सुरु आहेत. पण एखादा शिक्षकच कोरोना पॉझिटीव्ह आल्यास विद्यार्थ्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढण्याचा मोठा धोका आहे. शिक्षकांचे कोविड चाचणीचे रिपोर्ट प्राप्त नसताना शाळा सुरू करण्याची एवढी घाई का? याची चर्चा सध्या पालकात सुरु आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्याने शासनाने 22 मार्च पासून शाळा बंद केल्या. तेव्हापासून विद्यार्थी घरात आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आॕनलाईन शिक्षण सुरु झाले. गेले काही महिने शिक्षक विद्यार्थ्याना ऑनलाईन पद्धतीने अध्यापन करीत आहेत.कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर शासनाने 23 नोव्हेंबर पासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला.ग्रामपंचायत, शिक्षण संस्था यांनी दक्षता घेऊन शाळा सुरु कराव्यात असे निर्देश शासनाने दिले आहेत. शिक्षकांची कोविड चाचणी करावी व ते कोरोना निगेटिव्ह असल्याची खात्री करावी, ग्राम शिक्षण समितीने शिक्षण संस्थाची परवानगी, शाळांचे निर्जंतुकीकरण , विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र घ्यावे इ. अटीस अधिन राहून शाळा सुरु करण्याचे आदेश दिलेले आहेत . 

जिल्ह्यातील काही शाळा सुरु आहेत. त्या शाळांमध्ये शिक्षक, विद्यार्थ्यांचे ताप, आँक्सिजन तपासणी करताना तसेच अध्यापन करताना विद्यार्थी व शिक्षक संपर्कात येतात. संबंधित शिक्षकांनी कोविड चाचणी करिता स्वॅब दिले आहेत. परंतु त्यातील काही शिक्षकांचे स्वॅबचे रिपोर्ट आलेले नाहीत. दुर्दैवाने एखाद्या शिक्षकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यास विद्यार्थी तसेच सहकारी शिक्षकांना कोरोना संसर्ग होण्याच्या शक्यतेचा गंभीर धोका असताना, शासकीय निर्देशांकडे दुर्लक्ष करून घाईगडबडीत शाळा सुरू करण्यामागील हेतू काय? असा सवाल जनमाणसात व्यक्त होत आहे.

शिक्षकांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट आल्याशिवाय शिक्षण संस्थानी शाळा सुरु करणे घातक ठरण्याची शक्यता आहे. शिक्षण संस्थांनी मुलांच्या हिताचा विचार करुनच शाळा सुरु कराव्यात.
प्रभाकर साळुंखे (पारगाव),सामाजिक कार्यकर्ते

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 teacher report not available student school started but confujan all parent