कोरोनाच्या संकटातही स्वप्नांचा पाठलाग : कोल्हापूरातील धाडसी तरुणांचा प्रेरणादायी प्रवास

आकाश खांडके
Friday, 14 August 2020

परिस्थितीशी सामना करत वाटचाल...

स्थानिक तरुणांचा परदेशात संघर्ष

 

 

कोल्हापूर : स्वप्ने उराशी बाळगून अनेकांनी परदेशात शिक्षण, नोकरीसाठी स्थलांतर केले, मात्र कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच शिक्षण, नोकरीचा प्रवास थांबला. या संकट काळात मन बळकट करून विविध गोष्टी अंगीकारल्या तर काही जण स्वदेशी परतले, मात्र हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता... अशाच या धाडसी तरुणांची प्रेरणादायी प्रवास आहे.

                                करण मिरजकर

अन्‌ तो कोल्हापुरात परतला...
नागाळा पार्कमध्ये राहणाऱ्या करण मिरजकरला लहानपणापासूनच खेळ आणि खेळ नियोजनाची आवड. अभियंता आणि डॉक्‍टर व्हावे, अशा स्वप्नांत स्पोर्टस्‌ मॅनेजर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. शिक्षण घेण्यासाठी लंडन येथील न्यू कॅसलला गेला. पहिले तीन महिने सर्व काही सुरळीत चालू होते. मार्चमध्ये कोरोनाचे संकट ओढवले आणि तो तेथे अडकला. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या हजारोंच्या घरात वाढत गेली. सरकारने लॉकडाउन घोषित केले. स्पोर्टस्‌ विषयाचा अभ्यासक्रम असल्यामुळे चार भिंतीत शिकणे शक्‍य नव्हते. त्यामुळे त्याने परतीचा पर्याय निवडला. िट्वटरद्वारे भारतीय दूतावासबरोबर संपर्क साधला. ‘वंदे भारत’ विमानसेवेत आपले नाव नोंदवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. तिकीट कन्फर्म झाले नाही. स्वदेशी जाता येईल, याची शाश्‍वती नसतानाही त्याने चार तासांचा रेल्वे प्रवास करून विमानतळ गाठले. शेवटच्या क्षणी अर्जांमधून त्याची निवड झाली, तिकीट कन्फर्म झाले आणि तो भारतात परतला.

हेही वाचा- ‘सकाळ’ स्टिंग ऑपरेशन : अन्य रुग्णांचा हकनाक बळी -

                              मिहीर मादनाईक

स्वप्नांचा पाठलाग सोडणार नाही...
मिहीर मादनाईकने बालपणी अमेरिकेत वास्तव्य केले. पुढे तो कुटुंबासह भारतात आला. उच्च शिक्षणासाठी त्याने अमेरिकेलाच जाण्याचे ठरवले. तयारी झाली आणि तो तब्बल १० वर्षांनी अमेरिकेला परतला. डलास, अमेरिका येथे त्याचे कॉलेज आहे. तीन महिने कॉलेज सुरू होते. त्याचवेळी इतर देशातील कोरोनाच्या बातम्या कानावर पडत होत्या, पण त्याची झळ अजून तिथे बसली नव्हती. बघता बघता कानावर पडणाऱ्या बातम्यांप्रमाणेच भोवतालची स्थिती झाली आणि कॉलेजने लेक्‍चर थांबवले. काही दिवसांतच कोरोना झपाट्याने पसरला. भारताला परतण्यापेक्षा त्याने तिथेच राहणाऱ्या मावशीकडे स्थलांतर केले. पुढील पाच महिने तो तिथेच होता. या काळात तो स्वयंपाक शिकला, भारतात असलेल्या मित्रांच्या मदतीने त्याने शॉर्टफिल्म साकारली.

                                    अभिषेक गावडे

अर्धवेळ नोकरी सुरू केली...
व्यवसाय उभारणीसाठी लागणारे तंत्रशिक्षण घेण्यासाठी अभिषेक गावडे याने सिडनी, ऑस्ट्रेलिया गाठले. सम्राटनगरमध्ये राहणारा अभिषेक स्थापत्य अभियंता आहे. अपेक्षा बाळगून तो सिडनीला गेला, पण कोरोनाने अपेक्षांवर पाणी फेरले. कॉलेज सुरू झाल्यानंतर तीन दिवसांत लॉकडाउन जाहीर झाला. कॉलेजने ऑनलाइन लेक्‍चर सुरू केले. नवीन लोकांबरोबर ओळख वाढवणे, कॉलेज कॅम्पसमध्ये शिकणे, स्वतः नोकरी करून पैसे कमविणे या सर्व गोष्टींना किमान सहा महिन्यांसाठी खीळ बसली. त्याने परत येण्याचा निर्णय घेतला, परंतु कुटुंबीयांनी, मित्रांनी धीर दिला. परिस्थिती आटोक्‍यात येताच त्याने अर्धवेळ नोकरी सुरू केली. अभ्यास व नोकरी याचे समीकरणही नीट जुळवले. 

                         शंतनू चिवटे

चार भिंतीच्या खोलीत तीन महिने
शंतनू चिवटेला उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची महत्त्वाकांक्षा होती. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने जर्मनीतील आखण या शहरातील विद्यापीठात ॲडमिशन घेतले आणि त्याने स्वप्नभरारी घेतली, पण काही दिवसांतच कोरोनाने स्वप्नपंख छाटले. सरकारने लॉकडाउन पुकारला. पुढील तीन महिने राहती खोली हेच त्याचे विश्व होते. घरी येण्याची ओढ होतीच, पण मार्ग नव्हता. पुन्हा त्याच जोमाने शिक्षणासाठी परत जाऊ का, अशी धास्ती होती. घरचेही त्याच्या चिंतेत होते. कोरोनाचा धोका पत्करून भारतात येण्यापेक्षा शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच भारतात परत येतो, असा विश्‍वास त्याने घरच्यांना दिला. संकटातील वेळ त्याने अभ्यास, व्यायाम व कौशल्य विकासासाठी वापरला.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid impact struggle of kolhapur youth abroad