शेतीचा लेखाजोखा मांडणाऱ्या ॲपची निर्मिती 

प्रकाश कोकितकर  
Saturday, 5 December 2020

शेतीबरोबरच एखाद्या प्लॉटमधील पिक त्यावरील खर्च आणि नफा समजणार आहे.

सेनापती कापशी (कोल्हापूर) : शेती समजून घेण्यास मदत करणारे, शेतीत कधी आणि कोणते काम करायचे आहे, उत्पन्न आणि खर्च किती? अशा अनेक गोष्टींचा संपूर्ण लेखाजोखा सांगणारे आणि सूक्ष्म आराखडा देणारे ‘अंकुर फार्मसीस’ हे डिजिटल फार्म मोबाईल ॲप हसूर बुद्रुक (ता. कागल) येथील गिरीश कुलकर्णी या तरुणाने तयार केले आहे. पाच हजार शेतकऱ्याना ते मोफत दिले जाणार आहे. त्याचे उद्घाटन शनिवारी (ता. ५) ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हसूर बुद्रुक येथे होणार आहे.  

शेतकरी खर्चाचा हिशेब ठेवत नाही, ठेवलाच तर तो ढोबळ असतो. खते गरजेनुसार नव्हे, तर उपलब्धतेनुसार दिली जातात. अनेकवेळा संपूर्ण माहिती अभावी अनावश्‍यक खते दिली जातात. या सर्वांमुळे उत्पादन खर्च वाढतो आणि शेतीतून प्रत्यक्ष किती मिळाले याचा पत्ताच लागत नाही. 
 
या सर्वावर उपाय म्हणून गेली चार वर्षे खपून मित्रांच्या मदतीने कुलकर्णी यांनी हे ॲप तयार केले आहे. त्यांना राजेंद्र व्हटकर, दीपक पाटील, श्रीराम फडतरे, गौरी कंटक, उत्तम परीट यांनी सहकार्य केले.

शेतीबरोबरच एखाद्या प्लॉटमधील पिक त्यावरील खर्च आणि नफा समजणार आहे. याशिवाय अहवाल टॅबमध्ये रोपांपासून ते पिक घरी येईपर्यंतचे १२ प्रकारचे अहवाल एकत्रित पाहता येतात. याशिवाय कोणत्या प्लॉटमध्ये कोणते पिक, पाणी, औषधे व कामे उद्या, पुढील आढवड्यात, पुढील महिन्यात काय आवश्‍यक आहे याची सूचना शेतकर-यांना अगोदर मिळते. शेतीकामासंबंधी सर्व तपशील यात कायम मिळतो. वैयक्तिक खर्चाचा तशीलही त्यात ठेवता येतो. हे ॲप भविष्यातही नाममात्र किंमतीत शेतकऱ्यांना मिळणार आहे. 

हे पण वाचामहाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय

 

पाच वर्षात दर्जेदार पीक घेऊन बाजारात न विकता अनेक कुटुंबे जोडून त्यांनाच ते विकत आहे. त्याचा विस्तार वाढवत आहे. स्वत:च्या समर्थ फार्ममध्ये स्वयंचलित ठिबक, मोबाईल ॲप्लिकेशन आणि त्यानंतर ग्रोटुरिझम असे काम करत आहे.
-  गिरीश कुलकर्णी, प्रयोगशील शेतकरी.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Creation of agricultural audit app