esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

crime case in belgaum Throwing pepper powder with a knife  attacker unknown

मच्छेतील प्रकार; मिरचीपूड टाकून चाकूने वार, हल्लेखोर अज्ञात

'तो' दिवस दोघी मैत्रीणींसाठी ठरला शेवटचा ; घटनास्थळावरील दृश्य मन हेलविणारे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : वॉकिंगला जाणाऱ्या दोघी विवाहित मैत्रिणींचा चाकूने वार करून निर्घृण खून करण्यात आला. हा प्रकार शनिवारी (ता. 26) मच्छेतील ब्रह्मलिंगनगर येथे घडला. रोहिणी गंगाप्पा हुलीमनी (वय 21) व राजश्री रवी बन्नूर (21, दोघीही रा. काळेनट्टी, ता. बेळगाव व सध्या रा. मच्छे) अशी त्यांची नावे आहेत. हल्लेखोर दुचाकीवरून आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. मात्र, खुनामागील ठोस कारण अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, दुहेरी हत्याकांडाने बेळगाव हादरले आहे.


याबाबत घटनास्थळावरुन तसेच पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी 

मच्छे येथे राजश्री आणि रोहिणी अलीकडेच राहण्यासाठी आल्या होत्या. यापैकी एक भाडेतत्त्वावरील खोलीत पतीसह राहत होती. दुसरी पतीसह नातेवाईकांच्या घरी राहायला होती. दोघीही नियमित वॉकिंगला जात. त्याप्रमाणे शनिवारीही सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्या मच्छे ब्रह्मलिंग मंदिरजवळ वॉकिंगसाठी गेल्या होत्या. तेथे दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी दोघींच्या डोळ्यांत मिरचीपूड फेकली. काही समजण्यापूर्वीच त्यांच्यावर चाकूने वार केले. हल्ल्यावेळी परिसरात कोणीही नसल्याचा फायदा घेत हल्लाखोरांनी त्यानंतर तेथून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडल्याचे पाहून लोकांनी एकच गर्दी केली. 


बेळगाव ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर तातडीने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करण्यासह स्थानिकांकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला; मात्र रात्री उशिरापर्यंत हल्लेखोरांचा थांगपत्ता लागला नाही. यामुळे त्यांची ओळख पटण्यासह हत्येमागील नेमके कारण कळू शकले नाही. 

हेही वाचा- फुटबॉल पंचांच्या मानधनावर पाणी ; पुढील हंगाम सुरू होण्याबाबत संभ्रम -


दरम्यान, राजश्री व रोहिणीचे सासर बेळगाव तालुक्‍यातील काळेनट्टी येथील असून त्या कौटुंबिक कारणांनी मच्छेत राहण्यासाठी आल्या होत्या. दोघीही काळेनट्टीतील असल्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्री होती. रोहिणी चार महिन्यांची गर्भवती असल्यामुळे त्या दोघीही नियमित सायंकाळी वॉकिंगला जायच्या. त्यानुसार आजही दोघी वॉकिंगसाठी बाहेर पडल्या; पण आजचा दिवस त्यांच्यासाठी शेवटचा ठरला. मच्छेतील ब्रह्मलिंगनगर येथे आल्यानंतर दोघींवर हल्लेखोरांनी मिरचीपूड फेकून चाकूने वार केले. दोघींनीही जीव वाचविण्यासाठी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. अवघ्या दहा ते पंधरा फुटांवर दोघींचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. दरम्यान, पोलिस आयुक्‍त डॉ. के. त्यागराजन यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे. 

हेही वाचा- World Tourism Day Special : ‘रिस्पॉन्सिबल टुरिझम’ कोकणची  गरज ; रोजगारनिर्मितीसाठी नव्या दिशा शोधाव्या लागणार -


घटनास्थळाचे चित्र भयावह 
हत्याकांड घडलेल्या ठिकाणचे दृश्‍य भयावह होते. दोघींच्याही पाठ आणि मानेतून रक्त वाहत होते. रोहिणी 21 वर्षीय असून ती चार महिन्यांची गर्भवती होती. दोघीही मैत्रिणींचा अलीकडेच विवाह झाला होता. सुखाचा संसार सुरू असताना त्यांची हत्या झाली. घटनास्थळी दोघींच्याही नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. 


""मच्छेतील दुहेरी हत्याकांडाची चौकशी सुरू केली आहे. याबाबत काही प्राथमिक माहिती मिळाली आहे; मात्र हत्या कोणी आणि का केली, याची ठोस माहिती मिळू शकलेली नाही. याचा तपास लवकरच पूर्ण केला जाईल.'' 
- डॉ. विक्रम आमटे, पोलिस उपायुक्त, बेळगाव

संपादन - अर्चना बनगे

go to top