तरुणांनो सावधान : काही मिनिटातच खात्यावरून पैसे होतायत गायब

लुमाकांत नलवडे | Saturday, 21 November 2020

तरुणाची फसवणूक; कस्टमर केअरशी संपर्क साधल्यानंतर प्रकार  

कोल्हापूर: एका ऑनलाईन पेमेंट ॲपच्या कस्टमर केअरवर संपर्क साधल्यानंतर फोन बंद झाला. काही क्षणात पुन्हा फोन आला आणि त्यांनी सांगितलेली सर्व प्रक्रिया त्या तरुणाने पूर्ण केली. त्यानंतर अवघ्या मिनिटात खात्यातून ६१ हजार ४०० रुपये वजा झाले. काही वेळेनंतर बॅंकेकडून आलेल्या एसएमएसमुळे हे पैसे खात्यातून गेल्याची माहिती त्याला मिळाली. फसवणूक करणाऱ्या अनोळखींनी संबंधित ॲपच्या फ्लॅटफॉर्मचा वापर केला असण्याची शक्‍यता आहे. संबंधित कस्टमर केअरच्या क्रमांकावरून ही फसवणूक झाली आहे. कस्टमर केअरचे हे क्रमांकच संशयास्पद असल्याचे दावा संबंधित तरुणाने पोलिस ठाण्यात दिलेल्या अर्जात म्हटले आहे. 

सायबर गुन्हेगारीचा हा प्रकार आजरा तालुक्‍यात घडला आहे. संबंधित तरुण हा संबंधित पेमेंट ॲपचा वापर करतो. एका राष्ट्रीय बॅंकेत त्याचे खाते आहे. या ॲपवरून त्याने मित्राला ४६० रुपये ट्रान्सफर केले. तेव्हा बॅंकेच्या खात्यातून हे पैसे कमी झाले; पण मित्राला ते पोचले नाहीत. त्यामुळे तरुणाने गुगलसर्च इंजिनवर जाऊन संबंधित ॲपच्या कस्टमर केअरचा क्रमांक मिळविला. त्या क्रमांकावर कॉल केला. तो कॉल बंद झाला आणि दुसऱ्या क्रमांकावरून फोन आला. तेव्हा तुमचे पैसे रिफंड (परत) मिळतील, असे सांगितले. त्याच कॉलवर संबंधित ॲपवर जाउन कॉन्टॅक्‍टमध्ये जावा व ‘हाय’ मॅसेज ज्या नंबरवर आला आहे, तेथे जावा आणि आलेला रिफंडिंग कोड डायल करा, असे सांगितले. तसे केल्यानंतर जो कोड ‘डायल’ केला तेवढी रक्कम खात्यातून वजा होत होती. असे एकूण चार टप्प्यात ६१ हजार ४०० रुपये खात्यातून वजा झाले आहेत. बॅंकेतून आलेल्या मॅसेजवरून ६१ हजार ४०० रुपये विनाकारण कमी झाल्याची माहिती मिळताच संबंधित तरुणाला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्याने संबंधित सर्व माहिती पोलिस ठाण्यात देऊन चौकशी करावी, अशी विनंती अर्जाद्वारे केली आहे.

हेही वाचा- प्रधानमंत्री आवास योजनेसाठी लाभार्थी शोधताना दमछाक! -

१७ नोव्हेंबरला ही फसवणूक झाली आहे. त्यानंतर आजपर्यंत ज्या क्रमांकावरून फोन आला होता, त्यावर संपर्क साधता येतो; मात्र त्या तरुणाच्या मोबाईल क्रमांकावरून फोन केल्यास उत्तरच दिले जात नाही, मात्र अन्य मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधल्यास संबंधित ॲपचे कस्टमर केअर असल्याचे सांगितले जाते. आजही हा क्रमांक सुरू आहे. ज्या क्रमांकावर पैसे तरुणाच्या खात्यावरून ट्रान्सफर झाले आहेत, तोही क्रमांक आजही सुरू असल्याचे तरुणाने ‘सकाळ’ ला सांगितले.

वाढते प्रकार
ऑनलाईन पेमेंट ही एक प्रतिष्ठेची बाब समजली जात आहे, मात्र त्यामध्ये धोकेही तितकेच आहेत. त्याचे सर्व ज्ञान घेतले जात नाही, किंबहुना आपली फसणूक कशी होऊ शकते, याची माहिती होत नाही, तोपर्यंत असे ॲप, ऑनलाईन पेमेंटची सुविधा वापरणे धोकादायक आहे. आता आणि यापूर्वीही अशा वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक झाल्याची उदाहरणे आहेत. असे प्रकार अलीकडे वाढत आहेत.

संपादन- अर्चना बनगे