
वनविभागाचे कर्मचारी मगरीच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. वनपरीक्षेत्रक डी. एच. पाटील यांनी नदीकाठावरील शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असा सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कोवाड : चिंचणे (ता. चंदगड) गावाच्या हद्दीतील ताम्रपर्णी नदीपात्रात असलेल्या घाटावर मगर व तीन पिल्लांचा वावर असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनाला आल्याने भितीचे वातावरण आहे. वनविभागाचे कर्मचारी मगरीच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. वनपरीक्षेत्रक डी. एच. पाटील यांनी नदीकाठावरील शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असा सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गेल्या काही दिवसापासून नदीपात्रात मगरीचा वावर असल्याची लोकांत चर्चा होती. गुरुवारी नदीपात्राबाहेर उन्हात पहुडलेल्या मगरीचा व्हीडीओ व्हायरल झाल्याने त्याला दुजोरा मिळाला. मगरीची माहिती मिळताच वनविभागाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांकडून माहिती घेतली. गेल्यावर्षीही याच ठिकाणी मगरीचा वावर असल्याचे सांगून ग्रामस्थांनी मगरीचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाकडे केली.
वनपाल जी. एम. होगाडे, वनरक्षक एस. एस. जीतकर, वनमजूर लहू पाटील, मारुती निर्मळकर या वनविभागाच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी सायंकाळी नदीकाठावर शोधमोहीम राबविली. चिंचणे, कामेवाडी, दुंडगे व कुदनूर येथील शेतकऱ्यांनी नदीकाठावर जाताना खबरदारी घ्यावी, अशा सुचना केल्या आहेत. नदीत मोठ्या प्रमाणावर मासे असल्याने मगरीचा अधिवास असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे नदीकाठावरील शेतीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
संपादन - सचिन चराटी
kolhapur