esakal | "मगर'मिठीने हिरण्यकेशी काठ भयभीत

बोलून बातमी शोधा

Crocodiles In Hiranyakeshi River Kolhapur Marathi News}

प्रदूषण विरहीत असलेल्या हिरण्यकेशी नदीला गेल्या चार वर्षापासून मगरमिठीने जखडले आहे. यामुळे हिरण्यकेशी नदी काठ भयभीत झाला आहे.

"मगर'मिठीने हिरण्यकेशी काठ भयभीत
sakal_logo
By
अजित माद्याळे

गडहिंग्लज : प्रदूषण विरहीत असलेल्या हिरण्यकेशी नदीला गेल्या चार वर्षापासून मगरमिठीने जखडले आहे. यामुळे हिरण्यकेशी नदी काठ भयभीत झाला आहे. हत्तीवडे ते अरळगुंडी पर्यंतच्या पट्ट्यात ठिकठिकाणी चार मगरींचे वास्तव्य असल्याने या पट्ट्यातील नागरिकांना नदीत दबकतच उतरावे लागत आहे. काठावरुन जातानाही शेतकऱ्यांना बिचकत जावे लागत आहे. वन खात्याकडून या मगरींच्या बंदोबस्ताची गरज ठळक बनली आहे. 

आजरा तालुक्‍यातील हत्तीवडे आणि गडहिंग्लज तालुक्‍यातील इंचनाळ ते नांगनूर, जरळी ते हेब्बाळ, नांगनूर ते अरळगुंडी या दरम्यानच्या नदीपात्रात मगरींचे वास्तव्य आहे. सध्या मगरींचे दर्शन दुर्मिळ झाले असले तरी ती पात्रातच आहेत. आठवड्यापूर्वी नांगनूरजवळ काठावर मगरीचे दर्शन झाले. सध्या ही मगरही कुठे दिसेनाशी झाली आहे. परंतु, या सर्व ठिकाणच्या मगरींकडून सुदैवाने अजून कोणत्याही माणसावर अथवा जनावरांवर हल्ला झाल्याचे ऐकीवात नाही. मात्र मगरींच्या दर्शनाने नदी काठ भयभीत झाला आहे.

मगरी उन्हाला काठावर येवून पहुडतात. याचीच भिती नागरिकांना अधिक आहे. शेतीकामासाठी जाणारे लोक नदीकाठावरुन जाण्यास बिचकत आहेत. नदीमध्ये उतरतानाही नागरिक मगरींची धास्ती घेत आहेत. निर्मूनष्य ठिकाणी पात्रात जनावरे घेवून जातानाही धाडस होईना. मगरींची धास्ती मनात ठेवूनच पोहणारे लोक नदीत उतरत आहेत. 

चित्री मध्यम प्रकल्पामुळे हिरण्यकेशी नदी 20 वर्षापासून बारमाही वाहते. कर्नाटकातील हिडकल जलाशयात मगरींची संख्या अधिक आहे. परंतु हिरण्यकेशीचे पाणी थेट या डॅममध्ये जात नाही. पावसाळ्यातील महापुरावेळी ओढ्यांच्या बॅक वॉटरमधून या मगरी हिरण्यकेशीत येत असल्याचा अंदाज वनखात्याचा आहे.

प्रदूषण विरहीत असलेल्या हिरण्यकेशी नदीत विविध जलचर प्राण्यांची मोठी मुबलकता आहे. या माध्यमातून मगरींना खाद्य मिळत असल्याने महापुरावेळी आलेल्या या मगरी बारमाही वाहणाऱ्या हिरण्यकेशी नदीतच स्थिरावल्याचे चित्र आहे. नागरिकांना भितीमुक्त वातावरणात वावरण्यासाठी या मगरींचा बंदोबस्त वनखात्याकडून होणे आवश्‍यक आहे. 

सलग दर्शन झाल्यासच बंदोबस्त करणे सोयीचे
हिरण्यकेशीत मगरी असल्या तरी एकाही जीवावर हल्ला झालेला नाही. नांगनूरजवळची मगर पकडण्यासाठी जाळ्यांची तयारी सुरु होती. तितक्‍यात ही मगर दिसणे बंद झाली. मगरींच्या वावरावर वनखाते लक्ष ठेवून आहे. सलग मगरीचे दर्शन झाल्यासच त्याचा बंदोबस्त करणे सोयीचे होते. 
- बी. एल. कुंभार, वनपाल गडहिंग्लज 

संपादन - सचिन चराटी

kolhapur