मुरुक्‍टेत धुमाकुळानंतर टस्कर मानवळेत ; ग्रामस्थांमध्ये धास्ती 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

शुक्रवारी दुपारी मांगनूर (ता. कागल) येथे आलेला हत्ती एका रात्रीत हसूर बुद्रुक, नांगरगाव, पाल, बारवे मार्गे गारगोटी जवळील पुष्पनगर हद्दीत गेला

पिंपळगाव (कोल्हापूर) - गेले सहा दिवस धुमाकूळ घालणारा टस्कर आज मानवळे हद्दीत दाखल झाला. मुरुक्‍टे (ता. भुदरगड) येथील शेतकरी शिवाजी मारुती जाधव यांचे बॅरेल फोडून ऊसपिकाचे टस्करने नुकसान केले. जितेंद्र तुकाराम जाधव, श्रीपती धोंडिबा शिंग, भूपाल आम्माण्णा मंगाज, नामदेव यशवंत खोचारे, आनंदा गणपती पोवार, आनंदा गणपती जाधव यांच्या भात पिकाचे नुकसान करीत हत्ती मानवळे हद्दीत गेला. मानवळे येथील राजेंद्र गणपती भारमल यांच्या उसातून, रंगराव शिंदे यांचे पोती भरलेले भात खाऊन हत्ती भांडेबांबर अरण्यात गेला. वनकर्मचारी वर्षा तोरसे, वनरक्षक मोहन पाळेकर यांनी मुरुक्‍टे (ता. भुदरगड) येथील शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकाची पाहाणी केली. 

मांगनूरमध्ये भाताचे नुकसान 
सेनापती कापशी ः शुक्रवारी दुपारी मांगनूर (ता. कागल) येथे आलेला हत्ती एका रात्रीत हसूर बुद्रुक, नांगरगाव, पाल, बारवे मार्गे गारगोटी जवळील पुष्पनगर हद्दीत गेला. काल दुपारपासून हत्तीकडून मांगनूर येथे सुमारे दोन एकर ऊस आणि भात पिकाचे नुकसान झाले. रात्रीपर्यंत वन खात्याचे अधिकारी व कर्मचारी मांगनूर येथे गस्त घालत होते. त्यानंतर या हत्तीने जंगलातून हसूर बुद्रुक गाठले. येथे शेतात मळणी करून ठेवलेले पाच पोती भात विस्कटले.

हे पण वाचा - मंदिरे उघडा, श्रद्धांशी खेळू नका

त्यानंतर लोकांनी उसकावल्यावर जंगल हद्दीतून भुदरगड तालुक्‍याच्या हद्दीतील नांगरगाव आणि पुढे पाल, बारवे येथील जंगलातून गारगोटी जवळील पुष्पनगर हद्दीत गेल्याचे कापशी परिमंडल वनअधिकारी बी. एन. शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, मानूर येथे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी सर्व शेतकरी उपलब्ध झाले नसल्याने येत्या मंगळवारी (ता. 27) वनखात्याकडून नुकसानीचा आढावा घेतला जाणार आहे. असेही श्री. शिंदे यांनी सांगिले. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crop damage from elephants in kolhapur