
आजरा तालुक्यात पावसाच्या माऱ्याने कापणीला आलेले भात पीक जमिनीवर लोळण घेत आहे. भात पिकाची काढणी आदीच जमिनीवर मळणी होत आहे.
आजरा : तालुक्यात पावसाच्या माऱ्याने कापणीला आलेले भात पीक जमिनीवर लोळण घेत आहे. भात पिकाची काढणी आदीच जमिनीवर मळणी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पावसामुळे शेतकरी धास्तावला असून, पाऊस कधी थांबतो, या प्रतीक्षेत तो आहे.
सध्या तालुक्यात सुगीच्या हंगामाला प्रारंभ झाला आहे. हाळवे भात पीक कापणीला आली आहेत. मडिलगे, उत्तूर, भादवण, बहिरेवाडी यासह मलिग्रे, सरोळी, निंगुडगे भागात लागवड झालेल्या हाळव्या भात पिकाची कापणी जोरात सुरू आहे. गेले दहा-पंधरा दिवस तालुक्यात ढगाळ वातावरण झाले असून, अचानक कधीही वळवाचा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कापणीस आलेली भात पीक पावसाच्या माऱ्याने जमिनीवर लोळण घेत आहेत.
तालुक्याच्या उत्तूर व पूर्व भागात वळवाचा पाऊस पडत असून, या गावात भात पिकांनी जमिनीवर लोळण घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यात वन्यप्राण्यांच्या उपद्रवाने शेतकरी त्रस्त झाला आहे. दुसरीकडे भातावर पडलेला करपा, कडा करपासह विविध रोग व किडी याला तोंड देत काबाडकष्ट करून, महागाईची बी बियाणे, खते वापरून काढलेले भाताचे पीक काढले असताना ते डोळ्यांदेखत पावसाने जमीनदोस्त होत असल्याचे पाहून शेतकऱ्याला सुगी घरी जाईल, याची खात्री राहिलेली नाही.
दुहेरी संकट
तालुक्याच्या पश्चिम भागात हत्ती, गवे व अन्य वन्यप्राण्यांनी उच्छाद मांडला आहे. त्याच्या तडाख्यातून कापणीस आलेली पिके वाचविणे अडचणीचे बनले आहे, तर उत्तूर परिसर व पूर्व भागात वळवाच्या पावसाने कापणीस आलेले भात पीक जमिनीवर लोळण घेत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात अडकला आहे.
संपादन - सचिन चराटी
kolhapur