डी. वाय. पाटील विद्यापिठाच्या  डॉ.  लोखंडे यांना ‘सर्ब-टेट्रा’ पुरस्कार जाहीर

D Y  Patil University Dr Lokhande gets Sarb tetra award education marathi news
D Y Patil University Dr Lokhande gets Sarb tetra award education marathi news

कसबा बावडा (कोल्हापूर) :  डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर इंटरडीसीप्लेनरी स्टडीज’चे संशोधन संचालक व अधिष्ठाता डॉ. सी. डी. लोखंडे यांना अत्यंत प्रतिष्ठेचा टेक्नॉलॉजी ट्रान्सलेशन अवॉर्ड (टेट्रा) जाहीर झाला आहे. भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या ‘सायन्स अँड रिसर्च बोर्ड’ (सर्ब) कडून हा पुरस्कार दिला जातो. 


संशोधनातून निर्माण होणारे तंत्रज्ञान सर्वसामान्यांसाठी उपयोगी  ठरणाऱ्या उपकरणामध्ये परावर्तीत करणाऱ्या उत्कृष्ट संशोधकांना ‘सायन्स अँड रिसर्च बोर्ड’ कडून ‘सर्ब-टेट्रा अवार्ड’ ने गौरवले जाते.  डॉ. लोखंडे यांनी ‘सॉलिड स्टेट सुपरकॅपॅसिटर फॉर एनर्जी स्टोअरेज’ या विषयावर सादर केलेल्या संशोधन प्रकल्पाची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या प्रकल्पामधून निर्माण होणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर हा उर्जा साठवणूक करणाऱ्या उपकरणांचा महत्त्वाचा भाग आहे. 

डॉ. लोखंडे यांच्यासह देशभरातील १० संशोधकांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. प्रकल्पातील जटिलता आणि वापर यामधील नाविन्यपूर्णता, तंत्रज्ञान हस्तांतरण, विद्यमान गरजा व औद्योगिक भागीदारीतील पूरकता यांना होणारा फायदा व प्रकल्पाच्या यशस्वीततेची शक्यता आदी निकषावर ‘सर्ब-टेट्रा’च्या तज्ज्ञ समितीकडून या पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारांतर्गत ३० लाख रुपयांचा निधी दिला जातो.
डॉ. सी. डी. लोखंडे हे कोल्हापूर येथील डी. वाय पाटील अभिमत विद्यापिठाच्या सेंटर फॉर इंटरडीसीप्लेनरी स्टडीजचे रिसर्च डायरेक्टर तसेच अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत. हा पुरस्कार मिळवणारे डॉ. लोखंडे हे अभिमत विद्यापीठाचे एकमेव संशोधक असून अन्य ९ संशोधक हे राष्ट्रीय विज्ञान संस्थांशी सबंधित आहेत.

अमेरीकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने अलीकडेच केलेल्या सर्व्हेनुसार डॉ. लोखंडे यांना अलाईड पदार्थ विज्ञान विभागातील संशोधकामधून भारतातून प्रथम क्रमांक मिळाला आहे. संशोधन क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान असून यापूर्वी अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्याना गौरवण्यात आले आहे. भारत सरकारच्या पेटंट विभागासाठी वैज्ञानिक सल्लागार म्हणून ते काम पाहतात. तसेच मा. राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून बनारस विश्व विद्यालयाच्या सर्वोच्च मंडळावर सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत.
 भारत सरकारच्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल विद्यापीठचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा यांनी डॉ. लोखंडे यांचे अभिनंदन केले.


संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com