सकाळ स्टिंग ऑपरेशन : रुग्णालयांतून नकारघंटा , कोरोना रुग्णांची होतेय फरपट

daily sakal sting operation corona patient hospital treatment kolhapur
daily sakal sting operation corona patient hospital treatment kolhapur

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. उपचाराविना अनेक रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. तातडीचे उपचार व्हावेत, यासाठी शहरातील नामवंत रुग्णालयात दूरध्वनीवरून विचारपूस करणाऱ्यांना कोरोना रुग्णांसाठी आमच्याकडे बेडच शिल्लक नाहीत, अशी माहिती दिली जात आहेत. ‘सकाळ’ने आज शहरातील अनेक रुग्णालयांत दूरध्वनीवरून कोरोना रुग्ण दाखल करायचा म्हणून फोन करून याबाबतची थेट माहिती गोळा केली. पण ज्या-ज्या रुग्णालयात फोन केले त्या-त्या दवाखान्यात बेड शिल्लक नसल्याचे सांगून फोन बंद केला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड आरक्षित केले आहेत. त्याचा कोणासाठी वापर केला जात आहे, हा प्रश्‍न आहे.


बातमीदार :  ‘‘नमस्कार, माझ्या नातेवाईकाला कोरोना झाला आहे. तुमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमीट करायचे आहे.’’
रुग्णालयातील व्यक्ती : ‘‘थांबा, मी दुसऱ्या सरांकडे देते.’’
बातमीदार : ‘‘मी गंगावेसमध्ये राहतो. माझ्या भावाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तुमच्या रुग्णालयात ॲडमीट करायचे आहे.’’
रुग्णालयातील व्यक्ती : ‘‘आत्ता आमच्याकडे बेड शिल्लक नाहीत. आम्ही तुम्हाला उपचाराबाबत मार्गदर्शन करू शकतो.’’ 
बातमीदार : ‘‘रुग्णाची अवस्था खूपच बिकट आहे. त्याला कदाचित ऑक्‍सिजनची गरज लागेल.’’
रुग्णालयातील व्यक्ती : ‘‘माफ करा, पण आत्ता खरंच बेड शिल्लक नाहीत. तुमचा मोबाईल क्रमांक द्या, हवे तर बेड रिकामे झाल्यावर कळवतो.’’


शहरात बेडअभावी कोरोना रुग्णांचे हाल कसे होतात, याचा हा प्रत्यक्ष घेतलेला अनुभव.

जिल्ह्यात प्रतिदिन सरासरी ५०० कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येतो. त्यांच्या मनात प्रचंड भीती आहे. आपल्या उपचार होणार का? उपचारानंतर आपणे या आजारातून बाहेर येणार का? असे एक ना अनेक प्रश्‍न मनात घर करत आहे. ज्यांचे स्वॅब घेतले आहेत ते अहवाल काय येणार, या चिंतेने ग्रासले आहेत. रिपोर्ट आल्यानंतर संबंधित रुग्ण तत्काळ उपचार घेण्यासाठी रुग्णालयांच्या पायऱ्या झिजवत आहेत. प्रत्येक ठिकाणी बेड शिल्लक नाहीत, हेच उत्तर ऐकून माघारी परतावे लागत आहे. एक तर पॉझिटिव्ह आल्याची भीती आणि दुसरीकडे रुग्णालयात घेतले जात नसल्याने रुग्ण आणि कुटुंबीय हवालदिल आहेत.


नेमके वास्तव जाणून घेण्यासाठी आज ‘सकाळ’ने शहरातील काही रुग्णालयात फोन करून बेडबाबत माहिती घेतली. यात सर्वच रुग्णालयांतून नकारघंटा आली. जिल्ह्यातील कोणत्याही दवाखान्यात रुग्णांवर दाखल करून घेऊन प्रथमोपचार करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत; मात्र प्रत्यक्षात अनुभव वेगळाच येत आहे.

अशी केली चौकशी... 
‘सकाळ’च्या बातमीदाराने आज कोरोना रुग्णाचा नातेवाईक बोलतो म्हणून शहरातील नामवंत रुग्णालयांत दूरध्वनी केले. आमच्या रुग्णाला आपल्या रुग्णालयात दाखल करून घेण्याचे आवाहन केले; मात्र आमच्या दवाखान्यात कोरोना रुग्णांसाठी बेड शिल्लक नाहीत, तुम्ही दुसऱ्या दवाखान्यात चौकशी करा, असे म्हणून फोन ठेवला जात होता.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com