वाढत्या वृक्षतोडीने इचलकरंजीत धोका

Danger In Ichalkaranji Due To Increasing Deforestation Kolhapur Marathi News
Danger In Ichalkaranji Due To Increasing Deforestation Kolhapur Marathi News

इचलकरंजी : शहरात वृक्षांच्या मुळावरच घाव घालण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. त्यामुळे शहरातील समृद्ध वृक्षसंपदा भविष्यात डेंजर झोनमध्ये येण्याची भीती आहे. गेल्या आठवड्यात दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये 14 झाडे तोडल्याबद्दल पाच जणांवर गुन्हाही नोंद झाला आहे. पालिका प्रशासनाकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे सोपस्कर केले जात आहेत. पण त्यातून बेकायदेशीरपणे होणाऱ्या वृक्षतोडीला पूर्णतः पायबंद बसलेला नाही. एकीकडे वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न होत असताना दुसरीकडे वृक्षांची होणारी कत्तल उद्योगनगरी असलेल्या इचलकरंजीसाठी धोकादायक बनत चालली आहे. 

इचलकरंजी औद्योगिक नगरी आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे. विशेष करून हवा प्रदूषण नियंत्रणात राहण्यासाठी वृक्षलागवड हि महत्त्वाची आहे. त्यासाठी सातत्याने वृक्ष लागवडीसाठी मोठा निधी शासनाकडून प्राप्त होत असतो. पण यातून वृक्षांची लागवड किती सफल होते, हा वादाचा विषय यापूर्वीच ठरला आहे. पालिकेने यापूर्वी वृक्षगणना केली आहे. 6 इंचापेक्षा जास्त खोड असलेली सुमारे 3 लाख 3 हजार विविध प्रकारचे वृक्ष आहेत. शहरात इतकी मोठी वृक्षसंपदा आहे. पण हळूहळू यावर कुऱ्हाड चालवण्याच्या प्रवृत्तीत वाढ होत आहे. 

बेकायदेशीरपणे वृक्षतोड केल्यामुळे पालिका प्रशासनाकडून पोलिसांत संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे शहरात वृक्षांची होणारी खुलेआम कत्तल चर्चेत आली आहे. मुळात पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनेक वृक्षांना जीवदान मिळाले आहे. त्यांच्या दक्षतेमुळेच अशा प्रकारांवर आळा बसत आहे. पण विविध कारणास्तव शहरात होणारी वृक्षतोड चिंताजनक होत चालली आहे. केवळ पोलिसांत तक्रार देऊन वृक्ष संपदा टिकणार नाही. यासाठी पालिका प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची आवश्‍यकता आहे. 

वाढणारी बांधकामे वृक्षांच्या मुळावर 
शहरात विविध प्रकारच्या बांधकामांची संख्या वाढत आहे. त्याचा नकळत परिणाम वृक्षतोडीवर होत आहे. सध्या सुरू असलेल्या गटारींची कामे करतानाही अनेक वृक्षांची तोड करण्यात आल्याची माहिती आहे. 

होर्डिंग्ज बंदीमुळे वृक्षतोडीला ब्रेक 
शहरात होर्डिंग्ज उभारण्यासाठी वृक्षतोड केली जात होती; पण होर्डिंग्ज उभारण्यावर बंदी घातल्यामुळे अनेक मोकाच्या ठिकाणी असलेले वृक्ष वाचले आहेत. 

वृक्ष दर हा 50 टक्‍यांहून कमी
मुळात इचलकरंजी शहराची भौगोलिक परिस्तिथी पाहता, वृक्ष दर हा 50 टक्‍यांहून कमी आहे. त्यात प्रसाशनाच्या डोळेझाक प्रवृत्तीमुळे राजरोस फांद्या तोडण्याच्या नावाखाली वृक्षांची कत्तल केली जाते. यावर सक्षम पर्याय म्हणजे नियमांची कडक अंमलबजावणी व एखाद्या वृक्षासंदर्भात फांद्या तोडण्याची परवानगी घेतली असेल तर पहिल्यांदा त्या वृक्षाचे चोहो बाजूंनी फोटो काढणे व फांद्या तोडल्यानंतरचे चोहो बाजूंनी फोटो काढणे बंधनकारक करावे. 
- अरुण बांगड, पर्यावरणवादी कार्यकर्ते

संपादन - सचिन चराटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com