वस्त्रनगरी इचलकरंजीत कोरोना रुग्णांत घट

Decrease In Corona Patients In Ichalkaranji Kolhapur Marathi News
Decrease In Corona Patients In Ichalkaranji Kolhapur Marathi News

इचलकरंजी : शहरातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे आशादायक चित्र वस्त्रनगरीत आहे. सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये घट होत आहे. परंतू बेफिकीर न वागता तितकीच खबरदारी आणखी काही दिवस तरी घेण्याची आवश्‍यकता आहे. प्रशासन पातळीवर गाफील न राहता यापुढेही सतर्कता कायम ठेवली पाहिजे. नागरिकांनीही जबाबदारीचे भान ठेवून शासनाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन केल्यास कोरोना चेनला ब्रेक लावता येणे शक्‍य आहे. 

जिल्ह्यात समूह संसर्गाला सर्व प्रथम इचलकरंजीत सुरुवात झाली. कुडचे मळा हा शहरातील पहिला कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. नंतर मात्र कोरोनाचा वस्त्रनगरीत उद्रेक झाला. शहरात कोरोनाचा फैलाव झाला. जुलै व ऑगस्टमध्ये तर कहरच झाला. बेड मिळणेही मुश्‍कील झाले. लॉकडाउनच्या पर्यायाचाही वापर केला. रुग्णांची संख्या झपाट्यायाने वाढत असतानाच मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने चिंता वाढत गेली.

प्रशासनानेही ही बाब गांभीर्याने घेतली. मृत्यूदर वाढल्यामुळे ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात झाली. यातूनच आयजीएम रुग्णालयात आवश्‍यक सुविधा मिळत गेल्या. अद्याप काही त्रुटी असतीलही पण कोरोनामध्ये आयजीएम रुग्णालयासह पालिका प्रशासनाने सुरू केलेली कोविड केअर सेंटर रुग्णांना आधार ठरले. येथे दिवसरात्र काम करीत असलेल्या सर्वांच्याच प्रयत्नामुळे कोरोना नियंत्रित येण्यास सुरुवात झाली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागातील नेहमी सतर्क असलेली यंत्रणा, नागरी आरोग्य केंद्रांचे ठोस नियोजन याचाही कोरोना रुग्णांची संख्या घट होण्यात हातभार लागत आहे. 

सध्या दररोज 100 हून अधिक रुग्णांच्या स्वॅबची तपासणी केली जात आहे. त्यामध्ये पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण 10 ते 15 रुग्ण इतके आहे. गेल्या आठवड्याभरापूर्वी दररोज किमान 50 हून अधिक रुग्ण सापडत होते. मात्र आता पाच-सहा दिवसांपासून रुग्ण सापडण्याचे प्रमाण खूपच कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. चाचण्या कमी होत असल्याच्या शंकाही व्यक्त केल्या. पण तशी परिस्थिती नसल्याचे स्पष्टीकरण आरोग्य अधिकारी डॉ. सुदीलदत्त संगेवार यांनी दिले. वास्तविक पूर्वीपेक्षा रुग्ण संख्या पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. 

या पार्श्वभूमीवर सामूहिक रोग प्रतिकार शक्ती शहरात तयार होत आहे. अनेकांना कळत- नकळत कोरोना संसर्ग होऊन गेला आहे. अनेकांच्या शरीरात ऍन्टी बॉडीज तयार झाल्याचे निदान होत आहे. यामुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण सध्या कमी झाले असले तरी पुढील काळही तितकाच महत्त्वाचा आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी तितकीच प्रभावीपणे करण्याची आवश्‍यकता आहे. कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी नागरिकांनीही तितकीच खबरदारी घेण्याची गरज आहे. प्रशासनानेही यापुढेही सतर्कता बाळगल्यास वस्त्रनगरीतून कोरोना हद्दपार होण्यास मदत होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com